लंडन - क्रिकेट विश्वात प्रतिष्ठित मानली जाणारी अॅशेस मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना रोमहर्षक झाला. यात बेन स्टोक्सच्या अविश्वसनीय खेळीने इंग्लंडने बाजी मारली. इंग्लंडने हा सामना १ विकेटने राखून जिंकला. या विजयाबरोबरच इंग्लंडने या मालिकेतील आव्हानही कायम ठेवत १-१ अशी बरोबरी साधली.
इंग्लंडच्या या विजयाचा शिल्पकार ठरला अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्स. त्याने दुसऱ्या डावात नाबाद १३५ धावांची शतकी खेळी केली. त्याने शेवटच्या विकेटसाठी जॅक लीचबरोबर महत्त्वपूर्ण नाबाद ७६ धावांची भागीदारीही रचली आणि इंग्लंडला विजय मिळवून दिला. या भागीदारीमध्ये लीचने १७ चेंडू खेळताना केवळ १ धावेचे योगदान दिले होते. तर स्टोक्सने यात झंझावती खेळी करत ७५ धावा केल्या होत्या.
बेन स्टोक्सच्या या खेळीने इंग्लंडने अशक्य वाटणारा विजय मिळवला. या विजयानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी बशली, टेवेक्सबरीजवळ एका रस्त्याला 'सर बेन स्टोक्स' असे नाव दिले आहे. हे नाव एका कार्डबोर्डवर लिहिलेले दिसून येत आहे. या लेनला आधी 'स्टोक्स लेन' असे नाव होते. पण नंतर स्टोक्सच्या पुढे चाहत्यांनी 'सर बेन' असे नाव लिहण्यात आले आहे. बेन स्टोक्सने या मालिकेआधी इंग्लंडला पहिला विश्वकरंडक जिंकून देण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
दरम्यान, बेन स्टोक्सने आपल्या कामगिरीने इंग्लंडसह जगभरातील क्रीडा चाहत्यांमध्ये आपली छाप सोडली आहे. यामुळेचं एका जोडप्याने आपल्या पहिल्या बाळाचे नाव हिन बेन असे ठेवले आहे.