मुंबई - 'पॉवर कपल' अशी ओळख असलेल्या अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी आपल्या मुलीचे पहिले छायाचित्र शेअर केले आहे. तसेच या फोटोत विरुष्काच्या मुलीचे नावही सांगण्यात आले आहे. प्रसूत झाल्यानंतर अनुष्काने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून तिने या पोस्टमध्ये चाहत्यांचे आभार मानत आपल्या मुलीचे नाव सांगितले आहे.
हेही वाचा - आयपीएलपूर्वी पंजाबच्या खेळाडूचा अबुधाबीत कहर, २६ चेंडूत ठोकल्या ८९ धावा!
'वामिका' असे विरुष्काने आपल्या मुलीचे नाव नाव ठेवले आहे. अनुष्काने शेअर केलेल्या फोटोत विराट आणि ती आपल्या मुलीकडे पाहताना दिसत आहेत. ११ जानेवारी २०२१ रोजी ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अनुष्काने बाळाला जन्म दिला. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत दोघे आई-बाबा होणार असल्याचे सांगितले होते. ''जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार'’, असे कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी विवाह केला. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे.
आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौरा अर्धवट सोडून पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता. भारताचे क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर अश्विन आणि रोहित शर्मा या सर्वांना मुलगी आहे. आता त्यांच्या क्लबमध्ये विराटचा समावेश झाला आहे.
करोनिएल वामिका -
फार कमी लोकांना माहीत आहे की, अनुष्का आणि विराटच्या मुलीला 'करोनिएल' म्हणून संबोधले जाईल. याचे मुख्य कारण म्हणजे करोना काळात जन्माला आलेल्या बाळांना 'करोनिएल' या विशेष नावाने संबोधले जाते. एवढेच नाही तर, या महामारीच्या काळात जन्मलेल्या बाळांना 'कोविड- किड' असेही काही ठिकाणी म्हटले जाते.