ब्रिस्बेन - ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाची कर्णधार एलिसा हिलीने यष्टीरक्षणाच्या विक्रमात भारताच्या महेंद्रसिंह धोनीला मागे टाकले. यष्टीरक्षक म्हणून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये हिलीने धोनीपेक्षा अधिक फलंदाजांना माघारी धाडले आहे. शिवाय, ती या स्वरूपात पुरुष आणि महिलांमध्ये यष्टीरक्षणात सर्वाधिक फलंदाजांना बाद करण्याच्या बाबतीतही अग्रेसर ठरली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या दुसर्या टी-२० सामन्यात हिलीने ही कामगिरी केली. ९९ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये हिलीचे ९२ बळी झाले आहेत, तर, धोनीच्या नावावर ९१ बळी आहेत. हिलीपाठोपाठ ३९ वर्षीय इंग्लंडची सारा टेलर आहे. साराच्या नावावर ७४ बळी जमा आहेत, सारानंतर राचेल प्रीस्ट ७२ आणि मेरिसा अगुइलीयाच्या नावावर ७० बळी जमा आहेत.
या सर्वांपाठोपाठ वेस्ट इंडिजच्या दिनेश रामदीनचा (६३) समावेश आहे. रामदीननंतर मुशफिकुर रहीम आहे. मुशफिकुरच्या नावावर ६१ बळी जमा आहेत. तथापि, दक्षिण आफ्रिकेचा मार्क बाऊचर या विक्रमात आघाडीवर आहे. बाऊचरने ४६७ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९९८ बळी घेतले आहेत. त्याच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट आहे. गिलख्रिस्टच्या नावावर ३९६ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ९०५ बळी जमा आहेत. या विक्रमात धोनी तिसर्या क्रमांकावर आहे. ५३८ सामन्यात धोनीने ८२९ फलंदाजांना माघारी धाडले आहे. गेल्या महिन्यात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला.