मुंबई - ब्रिस्बेन कसोटीसाठी जेव्हा भारताच्या ११ खेळाडूंचा अंतिम संघ निवडला गेला. तेव्हा अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. कारण या कसोटीसाठी वॉशिग्टन सुंदरला संघात स्थान देण्यात आले. अनुभवी फिरकी गोलंदाज कुलदीप यादव असताना, नवख्या सुंदरला स्थान देण्यात आल्याने, अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. अनेकांच्या मते, सुंदरच्या जागेवर कुलपीला संधी मिळायला हवी होती. आता या विषयावर कर्णधार अजिंक्य रहाणेने स्पष्टीकरण दिले आहे.
एका क्रीडा संकेतस्थळाशी बोलताना अजिंक्य म्हणाला, 'हा निर्णय खूप कठीण होता. कारण कुलदीपचा समावेश संघात एक गोलंदाज म्हणून करण्यात आला होता. यामुळे त्याचे संघातील स्थान निश्चित होते. पण आम्हाला संघासाठी एक बेस्ट कॉम्बिनेशन बनवायचे होते. वॉशिग्टनला फलंदाजीमुळे संघात स्थान दिले. मी पाच गोलंदाजांसह मैदानात उतरण्याच्या विचार करत होतो आणि सुंदर गोलंदाजी देखील करू शकत होता. आम्हाला माहित होते की, तो एक चांगला फलंदाज देखील आहे. त्याने ते दाखवून देखील दिले.'
दरम्यान, कर्णधार अजिंक्य रहाणेचा विश्वास वॉशिग्टन सुंदरने सार्थ करून दाखवला. त्याने ब्रिस्बेन कसोटीतील पहिल्या डावात चिवट फलंदाजी करत ६२ धावांची खेळी साकारली. दुसऱ्या डावात त्याने २२ धावा केल्या. याशिवाय त्याने गोलंदाजीत ४ विकेट घेत भारताच्या विजयात हातभार लावला. भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील चार सामन्याची मालिका २-१ ने जिंकली.
हेही वाचा - IND VS ENG : प्रेक्षकांसाठी मैदानाची दारे बंद; चेन्नईतील कसोटी सामने विनाप्रेक्षक होणार
हेही वाचा - PAK VS SA : दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तान दौरा, जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड