नवी दिल्ली - भारताविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोरील अडचणींमध्ये आणखी वाढ होताना दिसत आहे. फिरकीपटू केशव महाराज पाठोपाठ सलामीवीर एडन मार्क्रमनेही भारत विरुध्दच्या तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे.
भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. त्यामुळे आफ्रिकेला रांचीमध्ये होणारा अखेरचा सामना जिंकून उरलीसुरली लाज राखायची आहे. आफ्रिकेचा संघ यासाठी अथक प्रयत्न करत आहे. पण, एडन मार्क्रमच्या दुखापतीमुळे आफ्रिकेची डोकेदुखी वाढली आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीदरम्यान मार्क्रमच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली होती. यानंतर सीटी स्कॅन केल्यानंतर मार्क्रमच्या उजव्या मनगटाच्या हाडाला दुखापत झाल्याचे दिसून आले. यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात मार्क्रम खेळू शकणार नाही. मार्क्रम पुढील उपचारांसाठी मायदेशी परतणार आहे.
दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यात आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजच्या खांद्याला दुखापत झाली. यामुळे त्याने रांचीमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यातून माघार घेतली. महाराजनंतर मार्क्रमनेही तिसऱ्या कसोटीतून माघार घेतली. त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी कोणत्या खेळाडूला अंतिम संघात जागा मिळते हे पहावे लागेल. मालिकेतील अखेरचा सामना १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानात रंगणार आहे.
हेही वाचा - Exclusive : बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीशी 'ईटीव्ही भारत'ची बातचित पाहा...
हेही वाचा - गांगुली म्हणतो, 'या' दोन व्यक्ती ठरवू शकतात भारत विरुध्द पाकिस्तानचा सामना