नवी दिल्ली - अफगाणिस्तानमध्ये मॅच फिक्सिंगप्रकरणी एक मोठी बातमी समोर आली आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) स्थानिक क्रिकेट प्रशिक्षक नूर मोहम्मद ललाई यांच्यावर कारवाई करत पाच वर्षांची बंदी घातली आहे.
मॅच फिक्सिंगच्या आरोपावरून नूर मोहम्मद यांना सर्व प्रकारच्या क्रिकेटशी संबंधित कार्यात भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. स्पॉट फिक्सिंगसाठी राष्ट्रीय संघातील खेळाडूशी संपर्क साधल्याबद्दल नूर मोहम्मद दोषी आढळले आहेत. नूर मोहम्मद हे कपिसा प्रांताचे सहाय्यक प्रशिक्षक तर, हंपालाना अकदामीचे पूर्णवेळ प्रशिक्षक होते.
अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय संघातील खेळाडूने नूर मोहम्मद यांच्याविरूद्ध तक्रार केली होती. एसीबीने या खेळाडूची ओळख मात्र जाहीर केलेली नाही. एसीबीने तीन महिन्यांपूर्वीच यष्टीरक्षक फलंदाज शफीकउल्लाह शफाकवर मॅच फिक्सिंगच्या आरोपामुळे सहा वर्षाची बंदी घातली आहे.