लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये अफगाणिस्तानने भारताला कडवी झुंज दिली. या रंगतदार सामन्यात त्यांना अवघ्या ११ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पराभवानंतरही अफगाणिस्तानचे मनोबल उंचावल्याचे दिसत आहे. कारण अफगाणिस्तानचा कर्णधार गुलबदीन नैबने 'हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे'.... या ओळीचा वापर करत प्रतिस्पर्धी संघाला इशारा दिला आहे.
अफगाणिस्तानने या स्पर्धेत आत्तापर्यत ६ सामने खेळले आहे. या सहाही सामन्यात त्यांचा पराभव झालेला आहे. मात्र, सहावा सामन्यात त्यांनी भारताला कडवी झुंज दिली. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. आता त्यांचा पुढील सामना बांगलादेशाबरोबर होणार आहे. या सामन्याच्या पूर्वी कर्णधार गुलबदीनने पत्रकार परिषदेत बांगलादेशच्या खेळाडूंना वार्निंग दिली आहे. या पत्रकार परिषदेत बोलताना गुलबदीनने हम तो डूबे हैं सनम, तुमको लेकर डूबेंगे अशा चारोळ्याचा वापर करत इशारा दिला.
स्पर्धेच्या सुरुवातीला अफगाणिस्तान चांगली कामगिरी करुन स्पर्धेत फेरबदल करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, अफगाणिस्तानच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे झालेल्या सहाही सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे.