मेलबर्न - ऑस्ट्रेलियन फिरकीपटू अॅडम झम्पाने आगामी मोसमासाठी न्यू साउथ वेल्ससोबत (एनएसडब्ल्यू) करार केला आहे. सात वर्ष दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करून झम्पा जुन्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. झम्पाने 2012 मध्ये एनएसडब्ल्यूकडून प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केले होते.
एनएसडब्ल्यू संघात तो नॅथन लायन, पॅट कमिन्स, जोश हेझलवुड, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क आणि डेव्हिड वॉर्नर यांसारख्या अव्वल क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करेल. ऑस्ट्रेलियाकडून टी-20 क्रिकेटमध्ये 33 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 75 बळी घेणाऱ्या झम्पाने सांगितले, "माझ्यासाठी मायदेशी परत येणे आणि माझ्या राज्याचे प्रतिनिधित्व करणे खूप महत्त्वाचे आहे. मी इथूनच सुरूवात केली होती. मी या मजबूत संघासह क्रिकेटमध्ये स्वत:ला सिद्ध करण्याची आशा बाळगतो. मला आशा आहे की लायनबरोबर खेळण्याची संधी मिळेल.''
मला कसोटी क्रिकेट खेळायचे आहे आणि हे माझे ध्येय आहे, असे झम्पाने म्हटले होते. त्याने ऑस्ट्रेलियाकडून 55 एकदिवसीय आणि 30 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. झम्पा म्हणाला, "सध्या माझे ध्येय कसोटी सामने खेळण्याचे आहे. गेल्या काही वर्षात ऑस्ट्रेलियाकडून मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे माझ्या पहिल्या श्रेणीतील संधी मर्यादित आहेत. मला लोकांचे मत बदलायचे आहे."