अहमदाबाद - भारतीय संघासाठी कर्णधार विराट कोहलीचा फॉर्म चिंतेचा विषय होता. कारण मागील अनेक सामन्यात विराटला मोठी खेळी करता आलेली नव्हती. पण विराटने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. पण त्याचा हा फॉर्म एका व्यक्तीमुळे परत आल्याची कबुली खुद्द विराटने दिली आहे.
विराट कोहलीला २०२० या सालामध्ये एकही शतक करता आले नाही. भारताकडून पदार्पण केल्यानंतर असे पहिलेच वर्ष ठरले ज्यात त्याला शतक करता आले नाही. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्याआधी विराटने अखेरच्या ४ सामन्यात ०, २७, ०, ० अशा धावा केल्या होत्या. धावांचा हा दुष्काळ विराटने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ७३ धावा करत संपवला. विराटने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारासह ही खेळी साकारली. विराटने या सामन्याआधी त्याचा खास मित्र दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू एबी डिव्हिलियर्सशी चर्चा केल्याचे सांगितले.
सामना झाल्यानंतर व्हर्चुअल पत्रकार परिषदेत विराटने सांगितले की, 'मी फोकस बेसिक्सवर केला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील सहकारी एबीशी चर्चा केली. एबी सोबतच्या चर्चेचा मला फायदा झाला. या चर्चेमुळेच मी चांगली फलंदाजी करू शकलो. एबीने मला चेंडूकडे पाहण्यास सांगितले आणि मी तसेच केलं'
विराटने त्याच्या खेळीचे श्रेय एबीसोबत संघ व्यवस्थापन आणि पत्नी अनुष्का शर्माला देखील दिलं. तो पुढे म्हणाला की, 'मी चेंडूवर लक्ष केंद्रीत केले. संघ व्यवस्थापनाने देखील मला काही गोष्टींवर भर द्यायला सांगितलं. अनुष्का देखील येथेच आहे. ती ही माझ्याशी बोलते.'
दरम्यान, विराटने दुसऱ्या टी-२० सामन्यात नाबाद ७३ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. या सामन्यात विराटने टी-२० मध्ये ३ हजार धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.
हेही वाचा - इशानच्या दमदार खेळीत आहे रोहितचा वाटा; खुद्द किशनने केलं कबूल
हेही वाचा - Just Married: जसप्रीत-संजना यांच्या नव्या इनिंगसाठी आयसीसीसह क्रीडा विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव