सेंचुरियन - अब्राहम डीव्हिलियर्सने 'जगातील धोकादायक फलंदाजा'चे बिरूद पुन्हा एकदा सार्थ केले. सुपर स्पोर्ट पार्क मैदानावर खेळल्या गेलेल्या सॉलिडॉरिटी कपमधील तीन संघांच्या सामन्यात डीव्हिलियर्सच्या इगल्स संघाने सुवर्णपदक जिंकले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला डीव्हिलियर्स बऱ्याच कालावधीनंतर मैदानात परतला. त्याने 24 चेंडूत 61 धावांची तुफानी खेळी साकारली.
डीव्हिलियर्सच्या खेळीच्या जोरावर इगल्सने 12 षटकांत 160 धावा केल्या. पहिल्या हाफमध्ये, काइट्स संघाने एका गडीच्या मोबदल्यात 58 धावा केल्या. तर, किंगफिशर्सने दोन गड्यांच्या मोबदल्यात 56 धावांची भर घातली. त्यामुळे किंगफिशर्स दुसऱ्या हाफपर्यंत पोहोचू शकला नाही. दुसरा हाफ इगल्स आणि काइट्स यांच्यात खेळला गेला.
दुसर्या हाफमध्ये डीव्हिलियर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी केली आणि पहिल्या हाफमध्ये सर्वाधिक धावा केल्याने 3 गडी गमावून 94 धावा केल्या. अशाप्रकारे, इगल्सची एकूण धावसंख्या 12 षटकांत 4 बाद 160 अशी होती. एडन मार्करामने 70 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना काइट्सचा संघ 12 षटकांत 3 गडी गमावून केवळ 138 धावा करू शकला.
अशाप्रकारे, इगल्सने सुवर्णपदक जिंकले. तर, काइट्सला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. किंग्सफिशर्स संघाला कांस्यपदक मिळाले.