हैदराबाद - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना आज हैदराबाद येथे सुरू आहे. या सामन्यात पुन्हा एकदा कांगारु कर्णधार अॅरोन फिंचने निराशा केली. तिसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा भोपळाही फोडता आला नाही. फिंच १०० व्या सामन्यात शून्यावर बाद होणारा तिसरा ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे.
यापूर्वी डीन जोन्स आणि क्रेग मॅग्डरमोट हेदेखील १०० व्या सामन्यात शून्यावर बाद झाले आहेत. फिंच मागील ८ सामन्यात ४५ धावा करू शकला आहे. गेल्या ८ डावात त्याने ०,८,०,१४,६,६,३ आणि ८ धावा केल्या आहेत. फिंचला १०० व्या सामन्यात करिष्मा दाखवता आला नाही.
फिंच तिसऱ्याच षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर महेंद्रसिंह धोनीकडून झेलबाद झाला. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही फिंचला चमकदार कामगिरी करता आली नाही. विश्वचषकापूर्वी त्याला फॉर्मात यावेच लागेल. अन्यथा त्याचे हे अपयश कांगारुंच्या संघाला फार महागात पडू शकते. स्मिथ आणि वार्नर यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाच्या संघात फिंच हा एकमेव अनुभवी खेळाडू आहे.