नवी दिल्ली - यंदाच्या आयपीएलने लीग टप्पा ओलांडला आहे. सध्याच्या घडीला मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे संघ प्ले-ऑफसाठी पात्र ठरले आहे. पहिल्या स्थानावर मुंबई, दुसऱ्या स्थानावर दिल्ली, तिसऱ्या स्थानावर हैदराबाद आणि चौथ्या स्थानावर बंगळुरूचा संघ आहे. यंदाच्या हंगामात नावाजलेले आणि आयपीएलमध्ये 'स्टार' अशी ओळख असलेले क्रिकेटपटू फॉर्मशी झगडत असल्याचे दिसून आले. लौकिकानुसार कामगिरी करू न शकलेल्या सहा खेळाडूंवर ईटीव्ही भारतने एक नजर टाकली आहे.
महेंद्रसिंह धोनी (वय : ३९, संघ : चेन्नई सुपर किंग्ज)
आयपीएल-१३मध्ये धोनीने चांगली सुरुवात करावी अशी अपेक्षा होती. कारण मागील वर्षी पार पडलेल्या विश्वकंरडक स्पर्धेनंतर तो एक वर्षाहून अधिक काळ व्यावसायिक क्रिकेट खेळलेला नाही. शिवाय त्याने स्पर्धा सुरू होण्याच्या एक महिन्यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
चेन्नई सुपर किंग्जसाठी तसेच त्याच्या संघासाठी हा धोनीचा सर्वात वाईट काळ होता. धोनीने १२ डावात फक्त २०० धावा केल्या. या मोसमात त्याची सर्वाधिक धावसंख्या नाबाद ४७ धावा होती. यावेळी चेन्नईला धोनी एक 'फिनिशर धोनी' म्हणून लाभला नाही.
शेन वॉटसन (वय: ३९, संघ: चेन्नई सुपर किंग्ज)
शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस यांच्या दरम्यान झालेल्या १८१ धावांच्या भागीदारीमुळे चेन्नईला ऑक्टोबरच्या सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाबवर १० गडी राखून विजय मिळाला. या कामगिरीमुळे स्टार फलंदाज वॉटसनने पुनरागमन केले. मात्र त्यानंतर वॉटसनने सहा डावांमध्ये केवळ ३० किंवा त्याहून अधिक धावा केल्या. चेन्नईच्या अंतिम सामन्यानंतर त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.
ग्लेन मॅक्सवेल (वय : ३२, संघ : किंग्ज इलेव्हन पंजाब)
किंग्ज इलेव्हन पंजाबने संपूर्ण हंगामात ग्लेन मॅक्सवेलला संधी दिली. पण मॅक्सवेलची बॅट शांत राहिली. या मोसमात मॅक्सवेलची सर्वाधिक धावसंख्या २४ चेंडूंमध्ये ३२ धावा होती. या मोसमात त्याने केवळ १०८ धावा केल्या. पंजाबला प्लेऑफमधून बाहेर जावे लागले.
आंद्रे रसेल (वय : ३२, संघ: कोलकाता नाइट रायडर्स)
आयपीएलचा हा हंगाम रसेलसाठी सर्वात वाईट ठरला आहे. २०१९च्या आयपीएल हंगामात रसेलने वादळ उठवले होते. त्याने ५६.६७च्या सरासरीने ५१० धावा केल्या. रसेलने आयपीएल-१३ मध्ये १३च्या सरासरीने ११७ धावा केल्या आणि त्याची सर्वोच्च धावसंख्या २५ होती. त्याने सहा विकेट्सही घेतल्या.
अॅरोन फिंच (वय : ३३, संघ : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार आणि फिंचने या मोसमात आतापर्यंत २३६ धावा केल्या आहेत.
पॅट कमिन्स (वय : २७, संघ : कोलकाता नाइट रायडर्स)
विक्रमी किंमत मिळालेल्या कमिन्सने कोलकातासाठी पहिल्या १० सामन्यांत फक्त ३ गडी बाद केले. त्यानंतर त्याने शेवटच्या चार सामन्यांत ९ विकेट्स घेतल्या. मात्र, हंगामाच्या शेवटी कमिन्सला सापडलेली लय संघाला प्लेऑफपर्यंत पोहोचवून देण्यात अपयशी ठरली.