चेन्नई - जर एखाद्या गोलंदाजला परदेशी मैदानावर यशस्वी व्हायचे असेल, तर त्याला कौशल्यासह थोडी नशिबाची गरज असते, असे मत भारतीय संघाचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने मांडले आहे. अश्विनची गणना भारताच्या सर्वोत्कृष्ट फिरकीपटूंमध्ये केली जाते. पण देश-विदेशात त्याच्या कामगिरीतील फरक स्पष्टपणे दिसून येतो.
एका ऑनलाईन कार्यक्रमात अश्विन संजय मांजरेकर यांच्याशी बोलताना म्हणाला, की मी माझ्या देशासाठी किती सामने जिंकले आहेत, मला मिळालेले यश, मी केलेली सर्वोत्कृष्ट कामगिरी ही माझ्या परदेशी दौर्याच्या कामगिरीला अनुसरुन पाहिली जाते.
तो पुढे म्हणाला, “जेथे जाईन तेथे मला समान यश मिळवायचे आहे. मला वाटले आहे की फिरकीपटूला वेगवेगळ्या परिस्थितीत गोलंदाजी करणे आणि त्याच आकडेवारीची पुनरावृत्ती करणे आवश्यक आहे. काही संधी मी गमावल्या आहेत. मी स्वतः वरच खूप टीका करतो. क्रिकेट परत कधी सुरू होईल हे ठाऊक नाही. पण जेव्हा आम्ही विदेशी दौर्यावर जाऊ तेव्हा मला वाटते की माझे सर्वोत्तम दिवस अजून बाकी आहेत.”