मुंबई - आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पणाचा सामना खेळताना कोणत्याही खेळाडूवर दडपण असतेच. टी-२० मध्ये तर इतर प्रकारापेक्षा जास्त असतं. कारण टी-२० प्रकारात तुमच्याकडे वेळ नसतो. कमी वेळेत तुम्हाला तुमची प्रतिभा दाखवावी लागते. या दडपणाला झुगारून काही खेळाडू मोठी खेळी करतात. काही यात अपयशी ठरतात. भारताच्या इशान किशनने दडपण झुगारुन पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याच्या या कामगिरीचे देशभरातून कौतूक होत आहे. याआधी टी-२० क्रिकेटच्या आपल्या पहिल्या डावात ४ भारतीय फलंदाजांनी अर्धशतक झळकावलं आहे. वाचा कोण आहेत ते खेळाडू...
रॉबिन उथप्पा -
रॉबिन उथप्पाने २००७ च्या टी-२० विश्वकरंडकात डेब्यूचा सामना खेळला. स्कॉटलॅडविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध त्याने सामना खेळला. यात त्याने ३९ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी साकारली.
रोहित शर्मा -
रोहित शर्माने देखील २००७ टी-२० विश्व करंडक स्पर्धेत पदार्पणाचा सामना खेळला. त्याने आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात ४० चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५० धावा केल्या होत्या.
अजिंक्य रहाणे -
अजिंक्य रहाणेने इंग्लंडविरुद्ध पदार्पणाचा सामना खेळला. त्याने ओल्ड ट्रॅफर्ड येथे झालेल्या सामन्यात ३९ चेंडूत ८ चौकारासह ६१ धावांची खेळी साकारली होती. भारताचा अनुभवी फलंदाज राहुल द्रविडचा हा अखेरचा सामना होता. पण या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला.
इशान किशन -
इशान किशनने इंग्लंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमधील पदार्पणाचा सामना खेळला. नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात किशनने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ५६ धावांची ताबडतोड खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने हा सामना ७ गडी राखून जिंकला.
हेही वाचा - इशानच्या दमदार खेळीत आहे रोहितचा वाटा; खुद्द किशनने केलं कबूल
हेही वाचा - ४९ चेंडूत नाबाद ७३ रन्स : विराट म्हणाला, 'या' खेळाडूशी चर्चा केल्याने सूर गवसला