शारजाह - चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झालेल्या सामन्यात दोन्ही संघांनी धावांचा डोंगर उभारला. या सामन्यात एकूण ३३ षटकार खेचले गेले. २०१८च्या आयपीएल हंगामामध्ये चेन्नई आणि बंगळुरूतील सामन्यातही इतकेच षटकार लगावले गेले होते.
चेन्नईविरूद्ध झालेल्या सामन्यात स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने १६ धावांनी विजय साकारला. या सामन्यात राजस्थानचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने नऊ षटकार ठोकले. तर, चेन्नईकडून फाफ डू-प्लेसिसने सात षटकार मारले. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि जोफ्रा आर्चर यांनी प्रत्येकी चार, चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तीन आणि सॅम करनने दोन षटकार लगावत सामन्यात रंगत आणली.
सॅमसनने प्रथम फलंदाजी करताना ३२ चेंडूंत ७४ धावा फटकावल्या. स्मिथने ४७ चेंडूत ६९ धावा केल्या. शेवटच्या षटकात आर्चरने आठ चेंडूंत २७ धावा केल्या. या सर्वांच्या योगदानामुळे राजस्थानने चेन्नईसमोर सात बाद २१६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात चेन्नईचा संघ २० षटकांत २०० धावा करू शकला. सीएसकेकडून फाफ डु-प्लेसिसने ३७ चेंडूत ७२ धावा टोलवल्या.