मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकताच इंग्लंड दौरा केला आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघाने एक कसोटी सामना खेळला. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तयार झाला आहे. या दौऱ्यात भारतीय महिला संघ आपला पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. उभय संघातील दौऱ्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पण कोरोना प्रोटोकॉलमुळे सिडनी आणि मेलबर्न मध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात आला आहे. यामुळे वेळापत्रकात बदल होण्याची दाट शक्यता आहे.
उभय संघातील मालिकेला 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. सिडनीत दोन्ही संघ एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरतील. यानंतर ते मेलबर्न आणि पर्थ येथे सामना खेळण्यासाठी रवाना होतील. पण आता यात बदल होण्याची शक्यता आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या विषयी सांगितलं की, सिडनी आणि मेलबर्नमध्ये लॉकडाउनमुळे सीमा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे उभय संघातील सामने नियोजित वेळापत्रकानुसार होण्याची शक्यता कमी आहे.
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलिया या विषयावर तेथील सरकारशी चर्चा करत आहे. जर यातून तोडगा निघाला नाही तर वेळापत्रकात बदल होऊ शकतो. नव्या वेळापत्रकाची घोषणा लवकरच करण्यात येण्याची शक्यता आहे.
असे आहे नियोजित वेळापत्रक
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 सप्टेंबर रोजी पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. यानंतर 30 सप्टेंबरपासून उभय संघात डे नाईट कसोटी सामना होईल आणि 7 ऑक्टोबरपासून टी-20 मालिकेला सुरूवात होईल.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघाने या दौऱ्यासाठी नवीन खेळाडूंना संधी दिली आहे. यात मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकूर आणि यस्तिगा भाटिया यांची टीम इंडियात प्रथमच निवड करण्यात आली आहे.
कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी असा आहे भारतीय महिला संघ -
मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उपकर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, पूनम राउत, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यस्तिका भाटिया, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), शिखा पांडे, झूलन गोस्वामी, मेघना सिंह, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, ऋचा घोष आणि एकता बिष्ट.
टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय महिला संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, यस्तिका भाटिया, शिखा पांडे, मेघना सिंह, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, पूनम यादव, ऋचा घोष (यष्टीरक्षक), हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, राधा यादव आणि रेणुका सिंह ठाकूर.
हेही वाचा - Eng vs Ind: जो रुटला साथ द्या, जोस बटलरचे संघातील फलंदाजांना आवाहन
हेही वाचा - Ind Vs Eng 3rd test : नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय