मुंबई - बीसीसीआयने आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची बुधवारी रात्री घोषणा केली. यासोबत महेंद्रसिंग धोनी भारतीय संघासोबत मार्गदर्शक (मेंटॉर) म्हणून राहणार असल्याचे देखील बीसीसीआयने स्पष्ट केले. पण आता धोनीच्या नियुक्तीविरोधात तक्रार देण्यात आली आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे माजी अधिकारी संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयला यासंदर्भात पत्र लिहित तक्रार केली आहे.
संजीव गुप्ता यांनी बीसीसीआयला लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे की, धोनीची नियुक्ती ही कॉन्फ्लिक्ट ऑफ इंट्रेस्ट म्हणजेच हितसंबंधांचा मुद्दा आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही, असे म्हटलं आहे.
दरम्यान, महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार आहे. तसेच त्याला आता बीसीसीआयने भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.
बीसीसीआयमधील सूत्रांनी पीटीआयला सांगितले की, होय, संजीव गुप्ता यांनी बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. यात त्यांनी एक व्यक्ती दोन पदांवर राहू शकत नाही, असे म्हटलं आहे. यासाठी त्यांनी बीसीसीआयच्या घटनेच्या कलम ३९ (४) चा हवाला दिला आहे.
दरम्यान, बीसीसीआयच्या उच्च कमिटीला आता आपल्या कायदेशीर टीमकडून याबाबत सल्ला घ्यावा लागणार आहे. यापूर्वी राहुल द्रविडवर देखील असा आरोप झाला होता. तेव्हा द्रविडने भारत अ संघाशी जोडले जाण्यापूर्वी आयपीएलशी असलेले आपले नाते तोडले होते. टी-20 विश्वकरंडक स्पर्धा यंदा ओमान आणि यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेला 17 ऑक्टोंबरपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - युझवेंद्र चहलला टी-20 विश्वकरंडक संघातून वगळलं, पत्नी धनश्री वर्माने शेअर केली भावूक पोस्ट
हेही वाचा - T-20 World Cup: आर. अश्विनचे भारतीय टी-20 संघात प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन