नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सोमवारी जाहीर केले की व्हायकॉम 18 (Viacom 18) ने आगामी महिला आयपीएलचे मीडिया हक्क पाच वर्षांसाठी हस्तगत केले आहेत. व्हायकॉम 18 ने हे हक्क तब्बल 951 कोटी रुपयांना विकत घेतले आहेत. त्यांनी लिलावात डिस्ने स्टार आणि सोनीसह इतर बोलीदारांना मागे टाकले आहे. सोमवारी मुंबईत क्रिकेट बोर्डाने टी-20 लीगसाठी लिलाव आयोजित केला होता.
ग्लोबल राइट्स मध्ये तीन श्रेणींचा समावेश : जागतिक अधिकारांमध्ये तीन श्रेणींचा समावेश होतो, रेखीय (टीव्ही), डिजिटल आणि एकत्रित (टीव्ही आणि डिजिटल). पुरुषांच्या आयपीएलमध्ये, प्रदेशांनुसार स्वतंत्र हक्क विकले जातात. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच वर्षांसाठी प्रति सामन्याची फी 7.09 कोटी रुपये असेल.
हेही वाचा : IPL 2023: सौरव गांगुलींची दिल्ली कॅपिटल्सच्या संघात पुन्हा एन्ट्री, 'या' पदी झाली नियुक्ती
जय शाह यांचे ट्विट : 'महिलांचे IPL मीडिया हक्क जिंकल्याबद्दल viacom18 चे अभिनंदन. BCCI आणि BCCIWomen वरील तुमच्या विश्वासाबद्दल धन्यवाद. Viacom ने INR 951 कोटी म्हणजे पुढील 5 वर्षांसाठी (2023-27) प्रति सामना मूल्य INR 7.09 कोटी इतके वचनबद्ध केले आहे. महिला क्रिकेटसाठी हे खूप मोठे पाऊल आहे', असे ट्विट शाह यांनी केले आहे. 'पे इक्विटीनंतर, मीडिया हक्कांसाठी आजची बोली महिला आयपीएलसाठी आणखी एक ऐतिहासिक निर्णय आहे. भारतातील महिला क्रिकेटच्या सक्षमीकरणासाठी हे एक मोठे आणि निर्णायक पाऊल आहे. हा निर्णय या खेळात सर्व वयोगटातील महिलांचा सहभाग सुनिश्चित करेल. महिला क्रिकेटसाठी ही खरोखरच एक नवीन पहाट आहे, असे त्यांनी आणखी एक ट्विट केले.
महिला आयपीएल : महिला आयपीएलचे उद्घाटन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत पाच संघ सहभाग घेणार असून सर्व सामने मुंबईत होणार आहेत. जून 2022 मध्ये झालेल्या तीन दिवसांच्या लिलावात Viacom 18 ने IPL चे डिजिटल अधिकार 23,758 कोटी रुपयांना विकत घेतले होते. तर डिस्ने हॉटस्टारने 2023 पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी 23,575 कोटी रुपयांचे आयपीएलचे टीव्ही हक्क राखून ठेवले होते.