नवी दिल्ली Babar Azam : एकदिवसीय विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमनं राजीनामा दिला आहे. त्यानं तिन्ही फॉरमॅटचं कर्णधारपद सोडलं. बाबरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघ भारतात आयोजित विश्वचषकाच्या बाद फेरीत प्रवेश करू शकला नव्हता.
विश्वचषकात पाकिस्तानची लाजिरवाणी कामगिरी : पाकिस्तानचा संघ विश्वचषकाच्या साखळी सामन्यातूनच बाहेर पडला. त्यांनी ९ पैकी फक्त ४ सामने जिंकले. पाकिस्तानची टीम गुणतालिकेत पाचव्या स्थानावर राहिली. स्वत: बाबरला या विश्वचषकात फलंदाजीत फारशी कमाल दाखवता आली नाही. त्यामुळे त्याच्यावर अनेक दिग्गज खेळाडू आणि चाहत्यांनी टीकेचा भडिमार केला होता.
सोशल मीडियावर पोस्ट केली : बाबर आझमनं स्वत: सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याची माहिती दिली आहे. प्रथमच कर्णधारपद मिळाल्याच्या घटनेची आठवण करून देत तो म्हणाला की, मी आज तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तान संघाचं कर्णधारपद सोडत आहे. मात्र, खेळाडू म्हणून खेळत राहणार असल्याचं त्यानं स्पष्ट केलं. बाबरनं 'X' वरील आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "मला तो क्षण चांगला आठवतो जेव्हा मला पीसीबीकडून २०१९ मध्ये पाकिस्तानचं नेतृत्व करण्यासाठी कॉल आला. गेल्या चार वर्षांत मी मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेक चढ-उतार पाहिले. मात्र मी मनापासून आणि पूर्ण समर्पणानं क्रिकेट जगतात पाकिस्तानचा गौरव वाढवण्याचं ध्येय ठेवलं."
पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करत राहीन : बाबरनं पुढे लिहिलं की, "आज मी तिन्ही फॉरमॅटमधील पाकिस्तानी संघाचं कर्णधारपद सोडत आहे. हा एक कठीण निर्णय आहे, मात्र मला वाटतं की हा निर्णय घेण्याची हीच योग्य वेळ आहे. मी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळाडू म्हणून पाकिस्तानचं प्रतिनिधित्व करत राहीन. नवीन कर्णधार आणि संघाला माझा पूर्ण पाठिंबा असेल. मला ही महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचाही आभारी आहे", असं त्यानं नमूद केलं.
पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप : विश्वचषकातील लाजिरवाण्या कामगिरीनंतर सध्या पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप आला आहे. सर्वप्रथम मुख्य निवडकर्ता इंझमाम उल हक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यावर हितसंबंधांच्या संघर्षाचाही आरोप आहे. यानंतर पाकिस्तानचा संघ शेवटचा सामना खेळून मायदेशी परतला तेव्हा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केलनंही आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता बाबरनंही कर्णधारपद सोडलं आहे.
इम्रान खाननंतर सर्वात यशस्वी पाकिस्तानी कर्णधार : बाबर आझमनं आतापर्यंत १३४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तान संघाचे नेतृत्व केलं. यापैकी त्यानं ७८ सामने जिंकले, तर ४४ सामन्यात पराभव पाहिला. १९९२ च्या विश्वचषक विजेत्या इम्रान खाननंतर बाबर हा पाकिस्तानचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
हेही वाचा :