टोकियो - भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने आज गुरूवारी खेळण्यात आलेल्या राऊंड १६ मध्ये डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टचा २१-१५, २१-१३ असा पराभव केला. सिंधूने मिया विरुद्धचा सामना अवघ्या ४१ मिनिटांमध्ये जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत तिचा सामना जपानच्या यामागुची आणि दक्षिण कोरियाचा किम गा उन यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
पी. व्ही. सिंधू बॅडमिंटनमध्ये पदकाची प्रबळ दावेदार आहे. तिने स्पर्धेत अपेक्षित आगेकूच केली. सिंधूने क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या मिया ब्लिकफेल्डचा दोन सरळ सेटमध्ये धुव्वा उडवला. या विजयामुळे सिंधूची मियाविरुद्धची आतापर्यंतच्या सामन्यांमधील सिंधूची कामगिरी ५-१ अशी झाली. म्हणजेच या दोघींमध्ये झालेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामने सिंधूने जिंकले आहेत.
सिंधूने मियाच्या विरुद्ध आक्रमक सुरूवात केली. ती पहिल्या सेटमध्ये ११-६ ने आघाडीवर होती. पण मियाने शानदार पुनरागमन करत स्कोर १३-१० असा केला. तेव्हा सिंधूने आपला अनुभव पणाला लावत स्कोर १६-१२ असा केला. मात्र मिया देखील मागे हटली नाही. तिने दमदार खेळ केल्याने सामना १६-१५ अशा स्थितीत पोहोचला. मात्र नंतर सिंधूने सामन्यावरील पकड मजबूत करत सलग पाच पॉईंट जिंकत पहिला सेट २१-१५ अशा फरकाने आपल्या नावावर केला.
दुसऱ्या सेटमध्येही सिंधूने चांगली सुरुवात करत ५-० ची आघाडी घेतली. तेव्हा मियाने चांगला खेळ करत स्कोर ३-६ पर्यंत आणला. मात्र हाफ टाइमपर्यंत सिंधूने ११-६ च्या फरकाने आघाडी घेतली होती. शेवटी तिने २१-१३ च्या फरकाने दुसरा सेटही जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. दरम्यान, सिंधूने हाँगकाँगच्या चियुंग हिचा सरळ दोन गेममध्ये सहज पराभव करत उपउपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती.
हेही वाचा - Tokyo Olympics: भारत 2 आणखी पदक जिंकण्याच्या जवळ पोहोचला; दीपिका आणि पूजाची दमदार कामगिरी
हेही वाचा - Tokyo Olympics: पूजा राणी पदकापासून एक पाऊल दूर, अल्जेरियाच्या बॉक्सरचा केला पराभव