क्वालालंपूर - रोमांचक सामन्यात बाजी मारत सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. तिने दुसऱ्या फेरीत दक्षिण कोरियाच्या एन से युंगचा पराभव केला. या सामन्यात सायनाने झंझावती खेळ करत बाजी मारली.
जवळपास ३८ मिनिटे रंगलेल्या सामन्यात नेहवालने २५-२३, २१-१२ अशी बाजी मारली. पहिला गेम रोमांचक ठरला. पिछाडीनंतरही सायनाने संयम दाखवत खेळ केला. तिने युंगला अखेरच्या क्षणापर्यंत वरचढ होऊ दिले नाही. तिने पहिला गेम २५-२३ अशा फरकाने जिंकला आणि सामन्यात आघाडी घेतली.
दुसऱ्या गेममध्ये सायनाने वर्चस्व कायम ठेवले आणि दक्षिण कोरियाच्या युवा बॅडमिंटनपटूला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. तिने दुसरा गेम २१-१२ फरकाने जिंकला. दोन्ही खेळाडू पहिल्यांदा आमने-सामने आले होते. उपांत्यपूर्व फेरीत सायनाशी गाठ आता ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मारिनशी होणार आहे.
हेही वाचा - बॅडमिंटनपटू साई प्रणीतचा पार पडला साखरपुडा, ८ डिसेंबरला होणार लग्न
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी