बासेल - सतत हुलकावणी देणारे सुवर्णपदक अखेर भारतीय स्टार पी. व्ही. सिंधूने पटकावले. तिने जपानची खेळाडू नाओमी ओकुहाराचा पराभव करत जागतिक बॅडमिंटन स्पर्धा जिंकली. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. या विजयासह सिंधूने २०१७ च्या जागतिक स्पर्धेतील अंतिम फेरीतील पराभवाची परतफेड केली.
अंतिम सामन्यात सिंधूने जपानची ओकुहारा हिचा २१-७, २१-७ ने पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूने आक्रमक खेळ केला. पहिल्या गेममध्ये सिंधूने ४-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतरही हाच धडाका कायम ठेवत तिने पहिला गेम २१-७ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये सिंधूचाच बोलबाला होता. तिने २-० पासून ५-२, ८-२ असे करत दुसरा गेमही २१-७ ने जिंकला. जागतिक विश्व बॅडमिंटनमध्ये सिंधूने आता एकूण पाच पदके जिंकली आहेत. यात एक सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य असा समावेश आहे.
सिंधू एकेरीमध्ये एक सुवर्ण, रौप्य जिंकणारी जगातील चौथी खेळाडू बनली आहे. ली लिंगवेई, गोंग रुईना आणि झांग निंग यानंतर सिंधूचा नंबर लागतो.
भारतीय बॅडमिंटन इतिहासात सिंधू सुवर्ण जिंकणारी पहिलीच खेळाडू आहे. यापूर्वी भारतीय सायना नेहवाल हिने २०१५ आणि २०१७ मध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक जिंकले होते. तर पुरुष गटात प्रकाश पादुकोण यांनी १९८३ साली आणि साई प्रणीय याने २०१९ मध्ये कांस्य पदक जिंकली आहेत.