नवी दिल्ली - ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती आणि जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन पी.व्ही. सिंधु आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती महिला कुस्तीपटू विनेश फोगाट आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) ऑलिम्पिक दिन कार्यक्रमात भाग घेतील. हा कार्यक्रम 23 जून रोजी होणार आहे.
विनेश जगभरातील 23 ऑलिम्पिक खेळाडूंसोबत प्री-रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये तिची खास कसरत (वर्कआउट) दाखवणार आहे, तर सिंधू जगातील 21 अव्वल खेळाडूंसह फिटनेस इव्हेंटमध्ये भाग घेईल. हा कार्यक्रम ऑलिम्पिक इन्स्टाग्राम पेजवर थेट प्रसारित केला जाईल. सिंधू हैदराबादमध्ये तिच्या घरातून ऑनलाइन कनेक्ट होईल.
आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी एका निवेदनात म्हटले आहे, "यावेळी ऑलिम्पिक दिनाचा कार्यक्रम प्रत्येक वेळेपेक्षा वेगळा असेल. पुढे ढकललेल्या टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी एकजूटसह खेळाच्या सामर्थ्याचा वापर करू."
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) चे अध्यक्ष थॉमस बाक आणि स्थानिक आयोजन समिती अध्यक्ष तोशिरो मोरी यांनी ऑलिम्पिकसाठी आणखी विलंब नाकारला होता. मात्र, पुढच्या वर्षी होणारी ऑलिम्पिक स्पर्धा शक्य असल्यास पुन्हा स्थगित करू, असे मत टोकियो ऑलिम्पिकच्या क्रीडा समितीचे सदस्य हरियुकी ताकाहाशी यांनी दिले आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा आता 23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या काळात होणार आहेत. तर पॅरालिम्पिक स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान आयोजित केल्या जातील.