जाकार्ता - भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इंडोनेशिया ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. सिंधूने उपांत्य सामन्यात जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या चीनच्या चेन यू फेईला 21-19, 21-10 ने पराभूत केले.
चीनची खेळाडू फेईने सामन्यात सुरूवातीला 3-1 बढत घेतली होती. तेव्हा सिंधूने आक्रमक खेळ करत 10-10 ने बरोबरी साधली. मात्र तिला ही लय कायम राखता आली नाही. ती 15-18 ने पिछाडीवर आली. मोक्याच्या क्षणी तिने 18-18 ने बरोबरी साधली. त्यानंतर तोच धडाका कायम ठेवत पहिला गेम 21-19 ने जिंकला.
त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये परत फेईने 4-1 अशी बढत घेतली. तेव्हा सिंधूने आक्रमक खेळ करण्यास सुरूवात केली. तिने 7-5 असा पलटवार केला. त्यानंतर सिंधूने 16-8 ची बढत घेत फेईला सामन्याच परतू दिले नाही आणि शेवटी तिने दुसरा गेम 21-10 जिंकत सामन्यात बाजी मारली.
पी. व्ही. सिंधूने यंदाच्या वर्षात प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. सिंधूने मागील वर्षाच्या अखेरीस वल्डर टूर स्पर्धेची अंतिम फेरीत धडक मारली होती. त्याच्या आठ महिन्यांनंतर सिंधूला अंतिम फेरी गाठता आली. अंतिम फेरीत सिंधूचा सामना जापानच्या अकाने या मागुची हिच्याशी होणार आहे.