नवी दिल्ली - कोरोनामुळे इंडिया ओपन सुपर ५०० स्पर्धा विनाप्रेक्षक खेळवण्यात येणार आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. यामुळे भारतीय बॅडमिंटन संघाने हा निर्णय घेतला आहे.
इंडिया ओपन सुपर ५०० स्पर्धेचे आयोजन ११ ते १६ मे या दरम्यान करण्यात आले आहे. ऑलिम्पिक विजेती कॅरोलिना मरिन आणि जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला जपानचा पुरूष खेळाडू केंटो मोमोटा देखील या स्पर्धेत सहभागी होणार आहे. चार लाख डॉलरचे बक्षिस असलेली ही स्पर्धा टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रतेसाठी अखेरची स्पर्धा आहे. यात चीनसह ३३ देशाचे २२८ खेळाडू सहभागी होणार आहेत.
भारतीय बॅडमिंटन संघाने सांगितलं की, देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, ही स्पर्धा विनाप्रेक्षक खेळवण्यात येत आहे. या स्पर्धेत खेळाडूंना बायो बबलमध्ये सुरक्षित ठेवले जाणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेत मरिन महिला एकेरीत विजयाची प्रमुख दावेदार आहे. तिच्यासमोर अकाने यामागुची, पी. व्ही. सिंधू, कोरियाची अन से यंग आणि थायलंडची पोर्नपावी चोचुवोंग यांचे आव्हान असणार आहे.
पुरूष एकेरीत मोमोटा, गतविजेता व्हिक्टर एक्सेलसन, एंडर्स एंटोंसेन, ऑल इंग्लंड चॅम्पियनशीपचा विजेता जी जिया ली यांच्यात खरी भिडत आहे. किदाम्बी श्रीकांत, बी साईप्रणीत, एचएस प्रणाय आणि पारुपल्ली कश्यप या भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर देखील सर्वांच्या नजरा असणार आहेत.
हेही वाचा - बीडब्ल्यूएफ ११ गुणांचे पाच गेम खेळवण्याचा विचारात
हेही वाचा - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात