क्वॉलालंपूर - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स स्पर्धेची दुसरी फेरी गाठली. पहिल्या फेरीत तिने बेल्जियमची लियाने टेन हिचा पराभव केला. तर दुसरीकडे पुरुष गटात बी. साईप्रणीत आणि किदाम्बी श्रीकांतला पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.
सायना नेहवालने लियाने हिचा ३६ मिनिटे रंगलेल्या सामन्यात २१-१५, २१-१७ असा पराभव केला. पहिल्यांदाच सायना आणि लियाने या दोघींमध्ये लढत झाली. दरम्यान, मागील वर्षी सायना मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत झाली होती.

पुरूष गटात साईप्रणीतला डेन्मार्कच्या रासमुस गेमके याने धक्का दिला. रासमुसने २१-११, २१-१५ असा फरकाने सामन्यात बाजी मारली. तर श्रीकांतला चीनच्या ताईपे के चाउ टिएन चेनने २१-१७, २१-५ अशा फरकाने हरवले. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या चेन याने अवघ्या ३० मिनिटात श्रीकांतला धूळ चारली.

हेही वाचा - ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणं हेच मुख्य ध्येय - सिंधू
हेही वाचा - 'एकेरीमध्ये भारतीय बॅडमिंटनपटूंची कामगिरी चिंताजनक', गोपीचंद यांचा ईटीव्ही भारतकडे खुलासा