नवी दिल्ली - भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने म्हटले आहे, की कोरोना व्हायरसमुळे खेळातून झालेल्या या अनपेक्षित ब्रेकमुळे मी मनापासून निराश झालो आहे. श्रीकांतने इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये शेवटची स्पर्धा खेळली होती.या स्पर्धेत त्याला पहिल्या फेरीत चीनच्या चेल लाँगकडून पराभव पत्करावा लागला.
श्रीकांतने एका वृत्तपत्राच्या स्तंभात आपली निराशा व्यक्त केली. तो म्हणाला, “एक खेळाडू म्हणून आम्हाला सहसा दौरा, प्रशिक्षण आणि त्यानंतर स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी नियमित ब्रेक हवा असतो. हा असा ब्रेक आम्हाला नको आहे. या ब्रेकमध्ये तुम्ही प्रशिक्षणही घेऊ शकत नाही. त्यामुळे मी खरंच निराश झालो आहे.”
तो पुढे म्हणाला, “माझ्याकडे बराच वेळ आहे, पण करायला काहीच नाही, म्हणून मी खूप वेळा झोपतो. त्याच ठिकाणी माझा बहुतेक वेळ जातो. मी दररोज १२ते १४ तास झोपतो.”
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे देशांतर्गत अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. पंतप्रधान मदत निधीसाठी श्रीकांतने देणगी जाहीर केली आहे. परंतु, त्याने किती मदत दिली हे सांगितले नाही.