बँकॉक - भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांना बुधवारी 'बीडब्ल्यूएफ' जागतिक मालिकेत पराभवाचा धक्का बसला. अंतिम टप्प्यातील ब-गटामधील आपले सलामीचे सामने दोघांनी संघर्षपूर्ण लढतीनंतर गमावले. सिंधूला तैवानच्या झु यिंगने तर श्रीकांतला डेन्मार्कच्या आंद्रेस अॅन्टनसेन याने पराभूत केले.
सिंधूने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेल्या तैवानच्या ताय झु यिंगविरुद्ध कडवी झुंज दिली. पण तरीही तिला २१-१९, १२-२१, १७-२१ अशा फरकाने पराभव पत्कारावा लागला. सिंधूची पुढील फेरीत रॅटचानोक इन्टॅनॉनशी गाठ पडणार आहे. दरम्यान, ताय झु यिंगविरुद्ध झालेल्या २१ सामन्यापैकी हा सिंधूचा १६ वा पराभव ठरला आहे.
दुसरीकडे पुरूष एकेरीत डेन्मार्कच्या आंद्रेस अॅन्टनसेनविरुद्ध श्रीकांतने पहिला गेम जिंकला. त्यानंतर आंद्रेसने दुसऱ्या गेम २१-१२ अशा जिंकत सामन्यात पुनरागमन केले. यानंतर त्याने हाच धडाका तिसऱ्या गेममध्ये कायम राखला. तिसरा गेम त्याने २१-१८ अशा फरकाने जिंकत सामना आपल्या नावे केला. श्रीकांतचा पुढील फेरीतील सामना तैवानच्या चौथ्या मानांकित वांग झु वेईशी सामना होणार आहे.
हेही वाचा - ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणं हेच मुख्य ध्येय - सिंधू
हेही वाचा - Exclusive : लोकांच्या अपेक्षा दडपण नाही, तर जबाबदारी, पी.व्ही. सिंधूची 'ईटीव्ही भारत'ला भेट