चीन - नुकतेच विश्वविजेती ठरलेली भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचा चायना ओपन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत धक्कादायक पराभव झाला. गुरुवारी झालेल्या सामन्यात थायलंडच्या पोर्न्पावी चोचुवाँगने सिंधूला १२-२१, २१-१३, २१-१९ ने पराभूत केले.
चायना ओपन स्पर्धेतील दुसऱ्या फेरीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. विश्वविजेती सिंधूला जागतिक क्रमवारीत १५ व्या स्थानावर असलेल्या पोर्न्पावी चोचुवाँग हिने पराभव केला. ५८ मिनिटे रंगलेल्या सामन्यात थायलंडची खेळाडू पोर्न्पावी चोचुवाँगने सिंधूवर विजय मिळवला.
हेही वाचा - चीन ओपन : सिंधू, प्रणीतची विजयी घोडदौड सुरू, सायना स्पर्धेबाहेर
सिंधूने सुरूवातीला पहिला गेम १२-२१ ने जिंकून आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर पोर्न्पावीने आक्रमक खेळ करत दुसरा गेम २१-१३ ने जिंकला. निर्णायक गेम जिंकून सिंधू सामना जिंकेल, अशी आपेक्षा होती. त्यानुसार सिंधूने खेळही केला. मात्र, मोक्याच्या क्षणी पोर्न्पावीच्या झंझावती खेळी करत सिंधूला पराभूत केले. निर्णायक गेम पोर्न्पावीने २१-१९ ने जिंकला. महत्वाचे म्हणजे, पोर्न्पावीने पहिल्यादांच सिंधूचा पराभव केला आहे.
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी
दरम्यान, या स्पर्धेत सिंधूने पहिल्या फेरीत पूर्व ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती ली शुरुईचा पराभव केला होता. भारताची दुसरी महिला खेळाडू सायना नेहवाल ही या स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभूत झालेली आहे. सायनाचा या स्पर्धेत थायलंडच्याच बुसानन हिने १०-२१, १७-२१ असा पराभव केला. सायना आणि सिंधूच्या पराभवानंतर महिला गटातून भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.