मुंबई - झी मराठीवरील 'माझा होशील ना' मालिकेतील आदित्यने म्हणजेच अभिनेता विराजस कुलकर्णीने नुकताच एक व्हिडीयो पोस्ट केला. मालिकेतील एका प्रसंग असून, ज्यात त्याने स्वत:वर गोळी झाडली गेल्याचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेच सईची भूमिका करणाऱ्या गौतमी देशपांडेनेही सुद्धा हातात बंदूक असलेला फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे प्रेक्षकांचे कुतूहल वाढले आहे.
झी मराठीवरील 'माझा होशील ना' ही कौटुंबिक मालिका आहे व त्यात बंदूक आणि गोळीबाराच्या घटना पाहून प्रेक्षक चलबिचल झाले आहेत. या लोकप्रिय मालिकेच्या आगामी भागामधील एक लहानसा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आणि सगळीकडे एकच गोंधळ उडाला. या व्हिडीओमध्ये आदित्यला गोळी लागताना दिसत असून तो खाली कोसळतोय असं दिसतंय. तसंच त्याने कॅप्शनमध्ये असं देखील म्हटलं आहे की, "प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट ठरलेला असतोच. तुम्ही सर्वांनी आदीच्या पूर्ण प्रवासात साथ दिली आहेत. त्याला दिलेल्या प्रेमासाठी आभार. आता त्याला तुमच्या प्रार्थनांची गरज आहे." आदित्यला त्याच्या पूर्वायुष्याबद्दल आणि तो आदित्य ग्रुप ॲाफ कंपनीज चा मालक असल्याबद्दलही कळणार आहे. त्यामुळे या हल्ल्याचा आणि आदित्यच्या पूर्वायुष्याचा संबंध नसेल ना हे पाहणं आश्चर्याचे ठरेल. विराजस कुलकर्णीनेच हा व्हिडीओ त्याच्या सोशल मीडियावरून शेअर करून मालिकेच्या चाहत्यांना धक्का दिला आहे. सुनील तावडे, विनय येडेकर, निखिल रत्नपारखी, विद्याधर जोशी असे अनेक ज्येष्ठ कलाकार या मालिकेचा हिस्सा आहेत. त्याचवेळी अभिनेत्री गौतमी देशपांडेने देखील एक असा फोटो शेअर केला आहे ज्याने या गोंधळात अजूनच भर पडली आहे. हातात पिस्तूल घेऊन गोळी झाडणाऱ्या सईचा हा फोटो असून या दोन्हीचा एकमेकांशी काय संबंध आहे? खरंच आदित्यचा मृत्यू होणार आहे का? सईच आदित्यवर हल्ला करणार? की कोणा दुसऱ्याने केलेल्या हल्याला परतवून लावण्यासाठी सईने हातात शस्त्र घेतलं आहे? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. झी मराठीवर प्रसारित होणाऱ्या 'माझा होशील ना' मालिकेच्या पुढच्या काही भागात या साऱ्या प्रश्नाची उत्तरे मिळतील अशी अपेक्षा आहे.
हेही वाचा - आईचे महत्व सांगणारा मराठी चित्रपट ‘माईज (माई's) स्पेशल'!