मालिकेच्या यशात कलाकार आणि दिग्दर्शकांसोबतच लेखक मंडळींचा देखिल महत्त्वाचा वाटा असतो.
आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दांचीच शस्त्रे यत्ने करू ।।1।।
शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन । शब्द वाटू धन जन लोका ।।2।।
तुका म्हणे पाहा शब्दचि हा देव । शब्देंचि गौरव पूजा करू ।।3।।
गणपती बाप्पा म्हणजे १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती. या बुद्धीच्या देवतेच्या उत्सवात स्टार प्रवाह वहिनीने स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ या गणपती विशेष कार्यक्रमात प्रवाह परिवारातल्या सगळ्या लेखकांचा सन्मान केला. गणरायाच्या उत्सवात प्रवाह परिवारातील २५ लेखकांचा गणरायाची मूर्ती देऊन सन्मानित करण्यात आला. पडद्यामागच्या याच कलाकारांना यानिमित्ताने पडद्यावर येण्याची संधी मिळाली.
![स्टार प्रवाह वाहिनीतर्फे २५ लेखकांचा सन्मान!](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-star-pravah-felicitates-25writers-mhc10001_13092021224418_1309f_1631553258_1030.jpeg)
संत तुकारामांच्या या ओळींमधून कळतं की लेखक हा किती समृद्ध कलाकार आहे. म्हणजे जसा एखादा मूर्तिकार त्याचा जीव ओतून मातीच्या गोळ्यापासून मूर्ती बनवतो तसाच लेखक हा विचारांच्या मातीच्या गोळ्याचं गोष्टीमध्ये रूपांतर करतो, त्याला वेगवेगळ्या भावनांची वस्त्र नेसवतो. काहींना दुःखाची झालर असते तर काही गोष्टी आपल्याला मनमुराद हसवतात आणि आनंद देऊन जातात. मग ती गोष्ट एका साच्यामध्ये बसवली जाते, त्या गोष्टीचे वेगवेगळे पैलू पडले जातात त्यातून निर्मिती होते पटकथेची आणि त्या पटकथेवर संवादांचा प्रसाद चढवला जातो. ह्या सगळ्या प्रवासानंतर ही मूर्ती लोकांच्या घरामध्ये आणि मनामध्ये दाखल होते.
![स्टार प्रवाह वाहिनीतर्फे २५ लेखकांचा सन्मान!](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-star-pravah-felicitates-25writers-mhc10001_13092021224418_1309f_1631553258_658.jpeg)
अशा ह्या आपल्या मूर्तिकारांना म्हणजेच लेखकांना स्टार प्रवाह कडून सन्मानित करण्यात आलं. सुषमा बक्षी, अभिजीत पेंढारकर, किरण कुलकर्णी, पल्लवी करकेरा, मुग्धा गोडबोले, शर्वरी पाटणकर, शिल्पा नवलकर, रोहिणी निनावे, मिथिला सुभाष, अभिजीत गुरु, विवेक आपटे, आशुतोष पराडकर, अश्विनी शेंडे, शिरीष लाटकर, चिन्मय कुलकर्णी, कौस्तुभ दिवाण, अनिल पवार, नितीन दीक्षित, ओमकार मंगेश दत्त, किरण येले, देवेंद्र बाळसराफ, नमिता नाडकर्णी, संदीप विश्वासराव, अक्षय जोशी आणि गौरी कोडीमाला अशा २५ लेखकांना गणरायाची मुर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
हेही वाचा - निखिल आडवाणी झालेत खूश, कारण, 'मुंबई डायरीज 26/11'ला मिळतोय प्रेक्षकांचा ‘पूश’!