मुंबई - पंडित जसराजजी अनेक कार्यक्रमावेळी गात असताना लोक त्यांना दाद देताना 'शतायुष व्हा' असे म्हणायचे. त्यावर पंडीतजी 'जय हो', म्हणत अशी दुवा करू नका, फक्त शेवटपर्यंत गळ्यात सूर असू द्या, अशी दुवा करा असे म्हणायचे. शेवटच्या क्षणीही त्यांच्यासोबत गळ्यात सरस्वतीचा वास म्हणजे सूर व त्यांचे 4 शिष्य सोबत होते. त्यांच्या इच्छेनुसार त्यांनी त्यांना हवे तसेच प्राण सोडले. या वयातही ते जगानुसार स्वतःला बदलत गेले. पंडितजींच्या जाण्याने कुटुंबाप्रमाणे संपूर्ण विश्वाचे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया देत असताना पंडित जसराज यांचा मुलगा सारंग देव व मुलगी दुर्गा यांना आपल्या भावना गहिवरून आल्या.
लॉकडाऊनच्या कालावधीत वयाच्या 90 व्या वर्षी त्यांनी 4 ऑनलाइन कन्सेप्ट केल्या. शेवटपर्यंत ते गातच होते, अशी माहिती दुर्गा यांनी दिली. तर पंडितजींचे पार्थिव मुंबईत आणण्यासाठी भारत व महाराष्ट्र सरकार, अमेरिका प्रशासन यांनी खूप मदत केली. त्याबद्दल पंडित जसराज यांच्या कुटुंबीयांनी आभार मानले. पंडित जसराज यांच्या अंत्य दर्शनाला आज अंधेरी येथील निवासस्थानी सुरुवात झाली आहे. प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे वयाच्या 90 व्या वर्षी अमेरिकेत न्यू जर्सी येथे 17 ऑगस्ट रोजी निधन झाले. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण या तिन्ही पद्म पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले शास्त्रीय गायक होते. त्यांचे पार्थिव विशेष विमानाने बुधवारी अमेरिकेतून भारतात आणण्यात आले. आज विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.