गेल्या वर्षी सुहास शिरवळकर लिखित ‘समांतर’ या कादंबरी वर त्याच नावाची मराठी वेब सिरीज बनली. त्या मालिकेच्या यशाचे श्रेय जाते या कादंबरीच्या सशक्त कथानकाला, नाविन्यपूर्ण दिग्दर्शनाला आणि कलाकारांच्या सशक्त अभिनयाला. प्रत्येकाच्या मनात सुप्तपणे वाटत असते की आपल्यासारखे शापित आयुष्य अजून कोणाचे नसेल. पण समजा असेलच तर? नेमक्या याच कल्पनेवर आधारित समांतर ही कादंबरी आहे. आयुष्यात मेटाकुटीला आलेल्या कुमार महाजन ला समोर येते त्याचा भविष्यकाळ जाणून घेण्याची सुवर्णसंधी. कोणीतरी असा मनुष्य आहे त्यांचेच आयुष्य कुमार महाजनला जगायचे आहे. मग शोध सुरू होतो त्या माणसाचा.... सुदर्शन चक्रपाणी याचा. सुदर्शन चक्रपाणी त्याने स्वतः लिहून ठेवलेल्या डायऱ्या पण कुमार महजनला देतो. पण रोज उद्याचेच पान वाचायचे अशी त्याची अट असते. सतीश राजवाडे आणि स्वप्नील जोशी ही ‘मुंबई-पुणे-मुंबई’ ची दिग्दर्शक-अभिनेता जोडी ‘समांतर’ मधून पुन्हा एकत्र आली होती.
समांतर १ मध्ये कुमार महाजनने सुदर्शन चक्रपाणीचा शोध घेतला. जो आधीच कुमारचे आयुष्य जगला आहे आणि कुमारच्या आयुष्यात पुढे काय होणार आहे, हे त्याला माहित आहे. सिझन २ मध्ये चक्रपाणी त्याच्या डायरीत लिहिलेला भूतकाळ कुमारच्या स्वाधीन करतो. आणि दरदिवशी एक पान वाचण्यास सांगतो, ज्यात कुमारचे भविष्य लिहिलेले आहे. यादम्यान त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा प्रवेश होणार असल्याचे भाकीत असते. ही गूढ स्त्री कोण आहे आणि चक्रपाणीने आपल्या डायरीत नमूद केल्याप्रमाणे कुमारला हीच नशिबाची साथ आहे का, याचा शोध १० भागांच्या थ्रिलरमध्ये होणार आहे.
या सिरीजला मिळालेल्या बेफाट पाठिंब्यामुळे साहजिकच याचा दुसरा सिझन येणार याची प्रेक्षकांना कल्पना होतीच. पहिल्या भागात स्वप्नील जोशी, नितीश भारद्वाज आणि तेजस्विनी पंडित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या एमएक्स ओरिजनलच्या 'समांतर' या वेबशोने प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आणि एका अशा वळणावर ही कथा आणून संपवली जिथे प्रेक्षक सिझन २ ची आतुरतेने वाट पाहू लागले. ही प्रतीक्षा आता संपली असून 'समांतर २' १ जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात सई ताम्हणकर सारख्या प्रतिभावान अभिनेत्रीचा प्रवेश होणार असून ती कुमार महाजनच्या आयुष्यात गुंतागुंत निर्माण करत असल्याचे दिसतेय.
सईने तिच्या वाढदिवशी या गोपनीयतेने झाकलेल्या व्यक्तिरेखेवर प्रकाशझोत टाकणारा प्रोमो तिच्या चाहत्यांसाठी आणला. त्या ट्रेलरमध्ये सई ताम्हणकरची झलक दिसते. कुमार ज्या नियतीच्या शोधात आहे, सई त्याचा भाग असेल का? कुमार आणि निमाच्या वैवाहिक आयुष्यात ती व्यत्यय आणणार का? ती चक्रपाणी यांच्यासोबत का दिसली? याचा अर्थ असा आहे की, सई यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे का? प्रेक्षकांच्या मनात असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. ‘समांतर २’ चे दिग्दर्शन नॅशनल अवॉर्ड मिळालेला चित्रपट ‘आनंदी गोपाळ’ फेम समीर विध्वंसने केले आहे.
‘समांतर २’ हा वेबशो मराठीसह हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत प्रेक्षकांना १ जुलैपासून एमएक्स प्लेअरवर विनामूल्य पाहता येणार आहे.
हेही वाचा - HBD : सई ताम्हणकर आणि करिष्मा कपूर यांच्या प्रकट दिनानिमित्त.....