मुंबई - बॉलिवूडमध्ये सध्या निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक राजकीय व्यक्तींवर बायोपिक तयार होत आहेत. बायोपिकच्या बाबतीत जणू काही स्पर्धा सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील बायोपिक अलिकडेच प्रेक्षकांना पाहायला मिळाले. नरेंद्र मोदी यांच्यावर आधारित बायोपिकही लवकरच प्रदर्शित होणार आहे. या बायोपिकच्या शर्यतीत आणखी एका राजकीय व्यक्तीची भर पडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्यावर आधारित बायोपिक लवकरच तयार करण्यात येणार आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, दिग्दर्शक सुभाष कपूर हे त्यांच्या बायोपिकचे दिग्दर्शन करणार आहेत. मायावतींच्या बायोपिकसाठी अनेक अभिनेत्रींचे ऑडिशन्स घेण्यात आले. यामधुन अभिनेत्री विद्या बालनची मुख्य भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे या बायोपिकबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
विद्याने यापूर्वीदेखील 'द डर्टी पिक्चर' या सिल्क स्मितावर आधारित बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारली होती. एनटीआर यांच्यावर आधारित बायोपिकमध्येही तिने त्यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यामुळे आता 'मायावती' यांच्या भूमिकेत तिला पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.