मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने राहत्या घरी निधन झालं. वयाच्या ६८व्या वर्षी आपल्या ठाण्यातील राहत्या घरीच सकाळी दहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक उत्तम नाटकं, सिनेमे. दूरदर्शन मालिका यांच्यात त्यांनी काम केलं होतं. त्यांच्या जाण्याने एक सच्चा कलाकार हरपल्याची भावना मराठी सिनेनाट्यसृष्टीतून व्यक्त केली जात आहे. ऐन तारूण्यातच नाटकात काम करण्याची धुंदी डोक्यात असल्याने त्यांनी नाट्यक्षेत्रात प्रवेश केला. शिवाजी मंदिर मधील एका नाट्यसंस्थेत त्यांनी नाट्य व्यवस्थापक म्हणून आपल्या कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यादरम्यान रमेश देव, सीमा देव, शरद तळवलकर, राजा परांजप, राजा गोसावी यासारख्या अनेक मातब्बर नटांसोबत काम करण्याची संधी त्याला मिळाली. पुढे अचानक रंगभूमीवर बदली कलाकारांच्या भूमिका करता करता अचानक अविनाश यांना वसंत सबनीस लिखित सौजन्याची ऐशी तैशी या नाटकात मुख्य भूमिका करण्याची संधी मिळाली. हे नाटक तुफान गाजलं आणि मराठी नाट्यसृष्टीला एक तरूण उमदा अभिनेता मिळाला.
त्यानंतर वासुची सासू या नाटकात त्यांनी दिलीप प्रभावळकर यांच्यासोबत काम केलं हे नाटकही कमालीचं गाजलं. नाटकात नाव कमावत असतानाच अविनाश यांना सिनेमात काम करण्याची संधी चालून आली. अविनाश खर्शीकर यांनी 1978 मध्ये 'बंदिवान मी या संसारी' या मराठी सिनेमाच्या माध्यमातून आपल्या कारकिर्दीला सुरूवा केली होती. जसा बाप तशी पोरं, आधार, आई थोर तुझे उपकार, माझा नवरा तुझी बायको, चालू नवरा भोळी बायको, बकुळा नामदेव घोटाळे, घायाळ, लपवाछपवी, माफीचा साक्षीदार या सारख्या अनेक सिनेमात अविनाश खर्शीकर यांच्या भूमिका गाजल्या होत्या. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी २० मराठी सिनेमांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या.