पालघर - वसईतील वीणा आल्मेडा हिने 'मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१९' हा किताब पटकावला. हा किताब मिळविणाऱ्या त्या वसईतील पहिल्या महिला आहेत. वीणा यांच्या या कामगिरीबद्दल त्यांच्यावर संपूर्ण वसईसह देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. गिरीज येथील कोंडारवाडीत वीणा राहत असल्या तरी त्या मूळच्या मंगलोर कर्नाटकच्या आहेत.
वसईतील गिरीज गावातील विराज आल्मेडा यांच्याशी विवाह केल्यानंतर त्या वसईकर झाल्या आहेत. वीणा आल्मेडा या शिक्षिका आहेत. नुकत्याच मॉरिशयसमध्ये आयोजित केलेल्या मिसेस इंडिया युनिव्हर्स २०१९ स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला होता. ऑक्टोबरमध्ये झालेल्या या स्पर्धेत संपूर्ण भारतामधून अंतिम फेरीसाठी वीणा आल्मेडा यांची निवड झाली होती. अंतिम फेरीमध्ये वीणा यांच्यासह ४० स्पर्धक होते. ही स्पर्धा ९ दिवस ट्रायनन कन्वेनशन सेंटर, मॉरिशयस येथे सुरू होती. या ९ दिवसांमध्ये विविध प्रकारचे पुरस्कार वितरण कार्यक्रम पार पडले. या पुरस्कारांमध्ये वीणा यांना सलग तीन किताब मिळाले. 'मिसेस इंडिया युनिव्हर्स महाराष्ट्र २०१९' , 'मिसेस इंडिया युनिव्हर्स वुमन ऑफ सबस्टन्स २०१९' आणि 'मिसेस इंडियाज युनिव्हर्स कॅटो चॉरिटी क्वीन २०१९' या पुरस्कारांचा त्यामध्ये समावेश आहे.