मुंबई - एकीकडे कॊरोना रुग्ण वाढत असताना दुसरीकडे लसीकरणानेही जोर पकडला आहे. सर्वसामान्य नागरिकांसह सेलिब्रिटीही आता लसीकरणासाठी मोठ्या संख्येने पुढे येत आहेत. त्यानुसार आज ही अनेक सेलिब्रिटीनी बीकेसी कोविड सेंटर गाठत कोविशिल्डचा पहिला डोस घेतला. यात अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या कुटुंबातील काही जणांनी आज लस घेतली.
लसीकरण मोहीमेचे कौतुक
आज बीकेसीमध्ये अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांनी लस घेतली. यावेळी त्यांनी लस सुरक्षित असल्याचे सांगतानाच बीकेसीतील लसीकरण मोहीमेचे कौतुकही केले. ज्येष्ठ नागरिक असो वा सेलिब्रिटी सगळ्याची योग्य काळजी घेतली जात असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे. तर ज्येष्ठ संतूर वादक पं. शिवकुमार शर्मा यांनी ही आज लस घेतली. केंद्र आणि राज्य सरकारकडून योग्य प्रकारे लसीकरण मोहीम राबवली जात आहे. ही लस सुरक्षित असून सगळ्यानी लस घ्यावी असे आवाहन ही यावेळी त्यांनी केले. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचे सासू-सासरेही आज बीकेसी कोविड सेंटरमध्ये आले आणि त्यांनी लस घेतली. त्याचवेळी सचिन तेंडुलकरचा भाऊ अजित तेंडुलकर, सचिनची काका-काकी यांनी ही लस घेतली.
हेही वाचा - VIDEO - पश्चिम बंगालमध्ये चहाचं राजकारण; दीदींच्या हातात केटली