नजीकच्या काळात कोरोनामुळे लादलेल्या लॉकडाऊनमुळे वेब सिरीज आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सुगीचे दिवस आले. अनेक नवीन वेब सिरीज बनत असताना कोरोनाचा हल्ला होण्याआधी उमेश कामत आणि प्रिया बापट या नवरा-बायकोच्या जोडीने 'आणि काय हवं’ ही वेब मालिका आणली होती आणि त्याला प्रेक्षकांचा अप्रतीम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आलेल्या ‘आणि काय हवं २’ ने सुद्धा कमाल केली होती आणि प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले होते. 'मुरांबा फेम' वरुण नार्वेकर दिग्दर्शत या मनोरंजक हंगामात प्रिया बापट आणि उमेश कामत यांनी या भूमिका साकारल्या आहेत. आता याचाच तिसरा सिझन येतोय.
उमेश कामत म्हणतो, ''मला खरोखरच असे वाटते, की आमच्यातील थोडा स्वभाव, गुण जुई आणि साकेतमध्ये आहेत. मला वाटते, वरुणने ते उत्तमरित्या पडद्यावर जिवंत केले आहे. यशस्वी वैवाहिक जीवनासाठी नात्यात संवाद आणि मैत्री असणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या जोडीदाराला समजून घेणे खूप महत्वाचे आहे. हाच संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही यातून केला आहे. या जोडप्यांमधील गंमतीजंमती आणि कठीण काळात एकमेकांना पाठिंबा देणे म्हणजे प्रिया आणि माझ्या ऑफस्क्रीन नात्याचे प्रतिबिंब आहे.''
सिझन १ मध्ये जुई आणि साकेत यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्यातील प्रत्येक पहिल्या गोष्टीचा आनंद साजरा केला. तर दुसऱ्या सिझनमध्ये लग्नाचे तिसरे वर्षं साजरे करत एकमेकांसोबत वेगवेगळ्या भावना शेअर केल्या. आता प्रेक्षकांच्या खास आग्रहाखातर ती या वेब मालिकेचा तिसरा भाग घेऊन येत आहेत. आता सिझन ३ मध्ये जुई आणि साकेतने लग्नाचा पाच वर्षांचा टप्पा गाठला असून त्यांच्यातील विश्वास, प्रेम आणि थोडा वेडेपणा देशभरातील लॉकडाऊन दरम्यान प्रेक्षकांना त्यांच्या जीवनाची ओळख करून देईल. कामासंबंधित गुंतागुंत सोडवण्यापासून ते अचानक असे वाटेपर्यंत की, आता दैनिक जीवनात नवीन बोलण्यासारखे काहीच उरले नाही. असा अनुभव घेणाऱ्या सर्व जोडप्यांचे नित्याचे जीवन ते आपल्या समोर आणणार आहेत.
तिसऱ्या सिझनबद्दल दिग्दर्शक वरुण नार्वेकर म्हणतात, '' पहिल्या दोन्ही सिझनना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळाले. तिसऱ्या सिझनमध्ये हे सुंदर आधुनिक नाते अधिक उलगडणार आहे. लॉकडाऊच्या निमित्ताने या समृद्ध नात्यात अधिक गोडवा येईल. जुई आणि साकेतचे पाच वर्षांचे नाते अधिकच बहरलेले दिसेल. 'आणि काय हवं' मधील जुई आणि साकेतच्या व्यक्तिरेखेसाठी प्रिया आणि उमेशची जोडी परफेक्ट आहे. त्यांच्या ऑफस्क्रिन केमिस्ट्रीचे प्रतिबिंब ऑनस्क्रिनही दिसते.''
आजची तरुणाई रिलेट करू शकेल असं कथानक निवडत नवीन लग्न झालेल्या जोडप्यांच्या संमस्यांवर चिमटे घेत उपाय दर्शविण्यात आल्यामुळे या मालिकेला तरुण मराठी प्रेक्षकांचा भरपूर पाठिंबा मिळत आला आहे. वैवाहिक जीवनातील सुरुवातीचा काळ हा नेहमीच खास असतो. परंतु जशीजशी वर्षे सरतात, तसे या नात्यातील नावीन्य कमी होऊ लागते. दैनंदिन जीवन सुरु होते. आयुष्यात मजा अशी काही राहातच नाही आणि रटाळ, कंटाळवाणे आयुष्य सुरु होते. अशा वेळी नवरा बायकोच्या नात्यातील मैत्री टिकवून ठेवण्यासाठी आणि या नात्यातील नावीन्य टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन मार्ग शोधणे किती गरजेचे आहे, याची जाणीव होऊ लागते. अशीच कहाणी आहे प्रेक्षकांच्या आवडत्या जोडीची म्हणजेच जुई आणि साकेतची. त्यांच्यातील हाच प्रेमाचा गोडवा घेऊन 'आणि काय हवं' चा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
सिझन ३ बद्दल प्रिया बापट म्हणते, ''लग्नाच्या पाच वर्षांनंतर जुई आणि साकेतचे नातेही समृद्ध होत आहे. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढउतारांना ते यशस्वीरित्या सामोरे जात आहेत आणि याच कारणास्तव मी ही व्यक्तिरेखा साकारली. हा सिझन आपल्याला लॉकडाऊनदरम्यानच्या जीवनात घेऊन जाणारा आहे. या काळात अनेकांच्या नातेसंबंधांमध्ये अनेक बदल झाले. आपले लग्न कधीही अस्थिर होऊ नये आणि आपले नाते अधिक दृढ होण्यासाठी नवीन छंद जोपासणे किंवा मग एखादा प्रोजेक्ट एकत्र करणे अथवा एखादी अशी गोष्ट जी एकत्र करताना मजा येईल, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधील आनंद शोधणे खूप महत्वाचे आहे. मी आणि उमेशही खऱ्या आयुष्यात यातील काही क्षण जगलो आहोत.''
एमएक्स एक्सक्लुझिव्ह आणि मिर्ची ओरिजनल्स क्रिएशनचे 'आणि काय हवं ३' येत्या ६ ऑगस्टपासून एमएक्स प्लेयरवर विनामूल्य पाहता येणार आहे.
हेही वाचा - आशा भोसले यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर