हिंगोली- या जिल्ह्याची ओळख ही मागासलेला जिल्हा म्हणूनच आहे. मात्र, आता कुठे हळुहळू विकासात्मक बदल होत आहेत. आता हिंगोली जिल्ह्यातील दोन चिमुकले टी-सिरीज कंपनीच्या प्रदर्शित होणाऱ्या अलबममध्ये नृत्य करताना झळकणार असल्याने सांस्कृतिक बाबतीत हिंगोली जिल्ह्याचे नाव पुन्हा उजळणार आहे.
अनुष्का गजानन हरणे (४), ब्रह्मा प्रवीण बुरुंगे (४) अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. अलबमसाठी मुंबई येथील चिमुकलीची निवड झाली होती. मात्र, तिची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे दिग्दर्शक शुभम गायके अन् कोरिओग्राफर अक्षय चौधरी यांनी अलबमसाठी चिमुकलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांनी बऱ्याच खासगी शाळेत ऑडिशन घेतले. मात्र, अपयशच आले. शेवटी हिंगोली येथे असलेल्या मित्राच्या सहाय्याने दोघांनीही हिंगोली येथे धाव घेतली. सर्वप्रथम पोतदार इंग्लिश स्कूल याठिकाणी चार ते सात वयोगटातील चिमुकल्यांचे ऑडिशन घेतले, तर तिथे चिमुकला ब्रह्मा पात्र ठरला. नंतर एबीएम इंग्लिश स्कुलमधील अनुष्का या चिमुकलीची निवड झाली.
कोरिओग्राफर अक्षयने या दोन चिमुकल्यांचा चार दिवस सराव घेतला. औंढा नागनाथ येथील उद्यान व हिंगोली शहरातील नव्याने बसविलेल्या पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात शूटिंग करण्यात आले. लवकरच हा अलबम प्रदर्शित होणार आहे. हिंगोलीची ही दोन्ही चिमुकले या अलबममध्ये झळकणार असल्याने, जिल्ह्याचे नाव मोठे होणार आहे.