प्रेम या विषयावर आजवर असंख्य कलाकृती निर्माण झाल्या आहेत. कविता, गाणी, नाटक अशा माध्यमातून अनेक सादरीकरणही पार पडलेत. मात्र, प्रेमाचे संवाद, कविता, गाणी आणि नृत्याच्या माध्यमातून एक रोमँटिक अनुभव देणारा कार्यक्रम नुकताच पुण्यात पार पडला. कार्यक्रमाचे नाव होते 'प्रेमिडोस्कोप' म्हणजेच प्रेमाचा कॅलिडोस्कोप.
हा केवळ वाद्यवृंद किंवा नाटक नव्हे; तो प्रेम या भावनेचा संगीतमय आणि हृदयात रुतून बसणारा अनुभव पुणेकरांनी अनुभवला. या शोचा आकर्षण ठरला सा रे ग म प लिटिल चॅम्प गाजवलेला, अजय अतुल, विशाल भारद्वाज, श्रीनिवास खळे यांच्याकडे गायलेला पद्मनाभ गायकवाड.
'प्रेमिडोस्कोप' या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाची संकल्पना वैभव कुलकर्णी यांची. अशी कल्पना सुचणे वेगळे, परंतु ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वैभव यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. या कार्यक्रमाचे लिखान त्यांचेच असून दिग्दर्शनाचे शिवधनुष्यही त्यांनीच पेललं आहे.
स्मिता सुर्यवंशी, वैभव कुलकर्णी, बाजीराव सुर्यवंशी आणि विशाल कुलकर्णी या मित्रांनी 'प्रेमिडोस्कोप'ची निर्मिती केली आहे. संगीत संयोजन अर्थात पद्मनाभ गायकवाड याचे आहे. करिष्मा पठारे, विष्णू घोलमे, ओंकार लोळगे, स्नेहा हेगडे, ओंकार इंगवले, ओंकार उजगरे, रविंद्र साप्ते, गंधर्व गुळवेकर, शुभम कुलकर्णी आणि इतर कलाकारांनी यात आपल्या अनोख्या कलेचे प्रदर्शन केले.
पुण्यात १४ तारखेला पार पडलेल्या प्रयोगानंतर निर्माते, दिग्दर्शक आणि कलारांचा आत्मविश्वास दुणावला आहे. लवकरच 'प्रेमिडोस्कोप'चे प्रयोग महाराष्ट्रातील शहरात होणार आहेत. तरुणाईला डोळ्यासमोर ठेऊन हा शो खास डिझाईन करण्यात आलाय.