नवी दिल्ली - बॉलिवूड गायक यो यो हनी सिंग उर्फ हिरदेश सिंहच्या पत्नीने तीस हजारी न्यायालयात घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याचिकेत शालिनी सिंगने म्हटले आहे की, हनी सिंह त्यांच्या हनीमूनच्या काळापासून तिला त्रास देत होता.
शालिनीने याचिकेत म्हटले आहे की, मॉरिशसमध्ये हनीमून दरम्यान हनी सिंगच्या वागण्यात बदल होऊ लागले. जेव्हा शालिनीने हनीसिंगला याबद्दल विचारले तेव्हा त्याने तिला बेडवर ढकलले आणि सांगितले की कोणीही हनी सिंगला प्रश्न विचारण्याचे धाडस करीत नाही, त्यामुळे तूदेखील प्रश्न विचारु नकोस.
हनीमूनच्या काळात घडलेल्या एका घटनेबाबत याचिकेत म्हटले आहे की, हनी सिंग हॉटेलच्या खोलीतून बाहेर पडला आणि 10-12 तास परत आला नाही. शालिनीसाठी ती जागा नवीन होती, ज्यामुळे ती खोलीत राहिली आणि हनी सिंगची वाट पाहत राहिली. त्या दिवशी हनी सिंग जेव्हा रात्री उशिरा परतला तेव्हा तो नशेत होता.
याचिकेत शालिनी तलवारने हनी सिंगकडून 10 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. याचिकेमध्ये दरमहा पाच लाख रुपये मासिक खर्च म्हणून देण्याची मागणी करण्यात आली असून दिल्लीत घराचीही मागणी करण्यात आली आहे.
महानगर दंडाधिकारी तान्या सिंह यांनी याचिकेवर सुनावणी करताना हनी सिंगला नोटीस बजावली आहे. न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. हनी सिंगची पत्नी शालिनी तलवारने अनेक गंभीर आरोप केले आहेत. याचिकेत हनी सिंगवर शारीरिक हिंसा, लैंगिक हिंसा आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. याचिकेत हनी सिंगच्या पत्नीने तिचे सासरे सरबजीत सिंग, सासू भूपिंदर कौर आणि नणंद स्नेहा सिंग यांच्यावरही घरगुती हिंसाचारात सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हेही वाचा - उमेश कामत म्हणतो, ‘प्रत्येक कपलने एकमेकांसाठी वेळ काढलाच पाहिजे’!