मुंबई - स्वप्निल जोशीचा 'मोगरा फुलला' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून स्वप्नीलची नवी भूमिका चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. श्रावणी देवधर यांनी बऱ्याच वर्षांनी या चित्रपटाद्वारे कमबॅक करण्याचा निर्णय घेतलाय. हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असतानाच या चित्रपटाचं मुख्य पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे.
'नाजुक नात्यांचा गुंफलेला गजरा', असं कॅप्शन असलेल्या या पोस्टरमध्ये स्वप्नील जोशीसह सर्व कलाकारांचा लूक पाहायला मिळतो. 'मोगरा फुलला' या चित्रपटात स्वप्निलसोबत दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी हे देखील भूमिका साकारणार आहेत. स्वप्निल जोशी 'सुनील कुलकर्णी' तर, चंद्रकांत कुलकर्णी हे 'मध्या काका'च्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. साई शक्ती आनंद, नीना कुलकर्णी, संदीप पाठक, आनंद इंगळे, सुहिता थत्ते, समिधा गुरू, विघ्नेश जोशी, दीप्ती भागवत, प्राची जोशी, विक्रम गायकवाड यांच्यादेखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.
श्रावणी देवधर यांच्या या सिनेमातून कौटुंबीक जबाबदाऱ्या पार पाडता पडता लग्नाचं वय सरून गेलेल्या एका तरुणाची गोष्ट मांडण्यात आली आहे. त्याच्या आयुष्यात एका वेगळ्या पार्श्वभूमीची मुलगी येते आणि त्याचं आयुष्य कसं बदलून जातं, हे या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. श्रावणी देवधर यांच्यासोबत लेखक सचिन मोटे यांनीही या सिनेमाच्या कथेवर काम केले आहे. अर्जुन सिंग बारने आणि कार्तिक निशानदार यांच्या 'जिसीम्स' या कंपनीने या सिनेमाची निर्मिती केली आहे. तर, पॅनोरमा फिल्म्सद्वारे या सिनेमाचं वितरण केलं जाणार आहे. १४ जून रोजी हा सिनेमा रिलीज होईल.