मुंबई - झी युवा वाहिनीने 'एक घर मंतरलेलं' ही थरारक मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे . मालिकेत सुरुची अडारकर गार्गी महाजन नावाच्या पत्रकाराची भूमिका साकारत आहे. आता या मालिकेत सुयश टिळक या लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्र्री झाली आहे. यामुळे सुयश आणि सुरुची या दोघांची लोकप्रिय जोडी 'का रे दुरावा' या मालिकेनंतर पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे.
उत्कृष्ट विषय, त्याची योग्य हाताळणी आणि उत्तम कलाकार यांनी बनलेली 'एक घर मंतरलेलं' ही मालिका आता मोठया रंजक वळणावर आली आहे. सुयश मालिकेत क्षितिज निंबाळकर हे पात्र साकारत आहे . क्षितिज हा एक नामवंत व्यवसायिक असून त्याला दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा छंद आहे. त्याचबरोबर अतिशय तर्कशुद्ध विचार करणारा आणि कोणत्याही गोष्टीला न घाबरणारा असा क्षितिज कोणत्याही गोष्टीचा सारासार विचार करून निर्णय घेतो. मालिकेची कथा 'मृत्युंजय या बंगला आणि या बंगल्याबद्दल असलेल्या अनैसर्गिक गूढ गोष्टींबद्दल असून या दोघांचे या बंगल्याशी काही ना काही कनेक्शन दाखवले आहे.
मृत्युंजय बंगला कोणीही विकत घ्यायला तयार नसताना अतिशय किरकोळ किमतीला मिळत असल्याने क्षितिज हा बागला विकत घेतो. तर या बंगल्यातील अनैसर्गिक गोष्टींचं गूढ उकलण्याचा प्रयत्न गार्गी (सुरुची अडारकर) करत असते. 'क्षितिज आणि गार्गी यांच्यामध्ये मृत्युंजय' बंगल्याच्या निमित्ताने पुढे नक्की काय घडणार याची उत्सुकता आता निर्माण होत आहे. क्षितिज आणि गार्गी यांचा मंतरलेल्या घरासोबतचा हा प्रवास नक्की कोठे जाऊन पोहोचतो ते मात्र ही मालिका पुढे काय वळणं घेते त्यावर अवलंबून आहे.