लॉकडाऊनच्या काळात भलेही सर्वजण घरात कैद होते, चित्रपटगृहे व नाट्यगृहे बंद होती, चित्रीकरणंही बंद होती परंतु संगीतक्षेत्रातील काम घरबसल्याही सुरु होते. या काळात अनेक नवीन ‘सिंगल्स’ जन्माला आली आणि अनेक गाणी तयार करण्यात आली. संगीतकार मंदार आगाशे यांनी तर कविवर्य सुरेश भट यांच्या वीस कविता संगीतबद्ध केल्या आणि त्याचा म्युझिक अल्बम तयार केला. ‘ठीक आहे छान आहे मस्त आहे' असे नाव धारण केलेल्या या म्युझिक अल्बम चे नुकतेच ऑनलाइन कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.
संगीतकार मंदार आगाशे म्हणाले की, “करोना प्रादुर्भावाच्या पहिल्या लाटेमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनच्या काळात रोज हा काव्यसंग्रह वाचत होतो. रोज चाली सुचत होत्या, त्यातून वीस गाणी तयार झाली. माझा सुरेश भट यांच्याशी बराच स्नेह होता. ते मला त्यांचे शब्द आणि माझी स्टाइल मिक्स करायला सांगायचे. आम्ही एकमेकांना पत्र पाठवायचो. माझ्यासारख्या नव्या संगीतकाराला खूप प्रोत्साहन द्यायचे, उदाहरणार्थ त्यांनी पाठवलेल्या प्रत्येक पत्राच्या शेवटी ते "गो अहेड" लिहायचे.”
![Suresh Bhatt's music album of poems](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-thikaahe-chhan-aahe-mast-aahe-music-album-released-mhc10001_29062021000838_2906f_1624905518_730.jpeg)
नव्या संगीत रचनांचा समावेश असलेल्या 'ठीक आहे छान आहे मस्त आहे' या म्युझिक अल्बममध्ये समाविष्ट असलेली वीस गाणी राहुल देशपांडे यांच्यासह गायिका आर्या आंबेकर, प्रांजली बर्वे, धनश्री देशपांडे गणात्रा यांनी गायली आहेत. म्युझिक अल्बमच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आगाशे यांनी या म्युझिक अल्बमच्या निर्मितीचा प्रवासही विशद केला.
या अल्बमची गाणी गाताना खूपच मजा आली. मला नेहमी भक्तीगीत किंवा शांत पद्धतीची गाणी गायला मिळतात, पणअल्बम मधील ‘रॅप’प्रकारातलं गाणं गाण्याची संधी मला मिळाली. सुरेश भटांचे शब्द इतके शक्तिशाली आहेत कि त्यांना न्याय देण्यासाठी मी वाचिक अभिनय केला आहे. हि गाणी तुमच्या मनात नक्कीच घर करतील असं धनश्री देशपांडे गणात्रा यांनी सांगितलं
![Suresh Bhatt's music album of poems](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-thikaahe-chhan-aahe-mast-aahe-music-album-released-mhc10001_29062021000838_2906f_1624905518_91.jpeg)
राहुल देशपांडे म्हणाले, “या अल्बममधील गाणी अतिशय छान आणि मेलडीयस आहेत. वरकरणी ही गाणी सोपी वाटली, तरी गायला अवघड आहेत. ‘ठीक आहे छान आहे मस्त आहे’ या अल्बमच्या निमित्ताने मला सुरेश भट यांचं काव्य गायला मिळालं. हा मेगा अल्बम हेतूसह आला आहे, ह्या अवघड वेळेस आपल्या मनाला आणि हृदयाला सुख शांती लाभण्यासाठी. आपल्या शेड्यूलमधून एक सकाळ घ्या आणि अल्बम ऐका. मला खात्री आहे की तुम्हाला केवळ अल्बमच आवडणार नाही तर मनःशांती मिळेल.”
आगाशे पुढे म्हणाले, “‘सप्तरंग’ हा सुरेश भटांचा अतिशय वेगळा काव्यसंग्रह आहे. त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कविता समाविष्ट आहेत. त्यांच्या शब्दांना संगीतबद्ध करता आल्याचा आनंद वाटतो. वेगवेगळ्या धाटणीची, जुन्या संगीताचा आनंद देणारी गाणी या अल्बममध्ये रसिकांना ऐकायला मिळतील. कलाकार म्हणुन आम्ही ह्या अल्बमच्या माध्यमातून लोकांना आशा आणि निराशेच्या गर्तेतून काढण्याचा प्रयत्न केला आहे.”
![Suresh Bhatt's music album of poems](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-mum-ent-thikaahe-chhan-aahe-mast-aahe-music-album-released-mhc10001_29062021000838_2906f_1624905518_97.jpeg)
“मंदार आणि माझी गेल्या २५ वर्षांची ओळख आहे. मंदार पाश्चात्य संगीताची सखोल माहिती असलेला संगीतकार आहे. पण या अल्बममध्ये त्यांनी त्यांची शैलीच बदलली आहे. अल्बममधील गाण्यांचं संगीत संयोजन करताना वेगवेगळ्या वाद्यांचा प्रयोगशील वापर करण्यात आला आहे,” असं संगीत संयोजक विवेक परांजपे म्हणाले.
‘ठीक आहे छान आहे मस्त आहे’या अल्बममधील गाणी स्पॉटीफाय, युट्यूब म्युझिक आणि आयट्यून्सवर ऐकता येतील आणि www.tcmahe.com या वेबसाइटवरून फ्री डाउनलोड करता येतील. तसेच रसिकांना या अल्बममधील गाण्यांचा आस्वाद लवकरच युट्युबवर देखील घेता येणार आहे.
हेही वाचा - धकधक गर्ल OTT वर: माधुरी दीक्षित झळकणार 'मेरे पास माँ है'मध्ये