मुंबई - सुभाष घई हे नाव तसं मराठी सिनेसृष्टीसाठी नवीन नाही. बॉलिवूडमध्ये 'शो मॅन' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सुभाष घई यांनी यापूर्वी मराठीत 'सनई चौघडे', 'वळू' आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'संहिता', या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता घई त्यांच्या मुक्ता आर्ट्स या बॅनरतर्फे विजेता या नव्या चित्रपटांची निर्मिती करणार आहेत.
नुकताच गोवा मराठी चित्रपट महोत्सवात त्याचं पहिलं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं. तर मुंबईत स्वतः सुभाष घई यांच्याच हस्ते मोठ्या थाटात या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला. खेळाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन अमोल शेडगे हे करणार आहेत. पुढच्या वर्षी २४ जानेवारीला तो प्रदर्शित करण्याचा निर्मात्यांचा मानस आहे.
या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे हा मध्यवर्ती भूमिकेत आहे. तर, अभिनेत्री पूजा सावंत देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेता सुशांत शेलार हा खलनायकाच्या भूमिकेत पहायला मिळेल. या तिघांशिवाय माधव देवचके, मानसी कुलकर्णी, देवेन्द्र चौगुले, तन्वी किशोर, क्रृतिका तुळसकर, प्रीतम कांगणे, दिप्ती धोत्रे, गौरीश शिपूरकर, ललित सावंत हे या चित्रपटात काम करताना दिसतील.
या सिनेमाचं लेखनही स्वतः अमोल शेडगे यांनीच केलं आहे. निर्माते राहुल पुरी, सहनिर्माते सुरेश पै असतील. तर आघाडीचे संगीतकार रोहन हे या सिनेमाला संगीत देणार आहेत.