मराठी मालिका, नाटक आणि सिंगिंग रिऍलिटी शो द्वारे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री स्पृहा जोशी आता हिंदी वेब विश्वात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'झी फाईव्ह' या डिजिटल अॅपवर गाजलेल्या 'रंगबाज' या वेब सिरीजचा नवा भाग 'रंगबाज फिरसे' या वेब सिरीजद्वारे ती महत्वाच्या भूमिकेत काम करताना दिसणार आहे.
या वेब सिरीजमध्ये स्पृहा रुक्मिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. जी अत्यंत साधी, सरळ आणि आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी मुलगी आहे. काही कारणामुळे त्याला आपला मार्ग सोडून गुन्हेगारी मार्गाकडे वळावं लागतं. मात्र, अस असलं तरीही ती त्यांची साथ सोडत नाही. वेब सिरीजचे शूटिंग मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये करण्यात आलं असून स्पृहा एका राजस्थानी मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे.
या वेब सिरीजच्या निमित्ताने स्पृहाचे एक खूप जून स्वप्न पूर्ण झालं आहे. कारण यात ती चक्क अभिनेता जिमी शेरगीलच्या सोबत काम करणार आहे. स्वतः स्पृहा जिमीची खूप मोठी फॅन आहे. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याचा फारच मोठा आनंद तिला झालेला आहे.
या दोघांशिवाय मालिकेत मोना आंबेगावकर, हर्ष छाया, झिशान आयुब, सुशांत सिंग यांच्याही मुख्य भूमिका आहेत. त्या सगळ्या दिग्गज नटसंचासोबत काम करताना जास्त जबाबदारीने काम करावं लागल्याचं तिने सांगितलं. वेब सिरीजच्या शूटिंगच्या निमित्ताने सर्वच जण 2 महिने घरापासून लांब होते. त्यामुळे सेटवरच एक कुटुंब तयार झालं होतं.
या वेब सिरीजचा एक दिग्दर्शक सचिन हा स्पृहाचा रुईया कॉलेजचा मित्रच होता. त्याच्यासोबतचे अनेक असिस्टंट रुईयाचे ज्युनिअर असल्याने रेपो डेव्हलप करायला फारसा वेळ लागलाच नाही. उलट पाहता पाहता शूटिंग संपलं. त्यामुळे शेवटच्या दिवशी सगळ्या टीमला आपण काहितरी करावं असं तिला वाटू लागलं. त्यामुळे हॉटेलच्या किचनचा ताबा घेत स्पृहाने सगळ्यांसाठी मस्त चिकन तयार केलं. जे खाऊन सगळ्या कलाकारांनी तिला मनापासून दाद दिली.
हिंदीचं सादरीकरण भव्य दिव्य असलं आणि संपूर्ण अनोळखी लोकांसोबत काम करावं लागलं असलं तरीही कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून काहीतरी करून पाहण्यासाठीच रंगबाज फिरसे ही वेब सिरीज केली, असे तिने सांगितलं आहे. ही वेब सिरीज येत्या 20 डिसेंबरपासून झी फाईव्ह अॅपवर सुरू होणार आहे. याच निमित्ताने तिच्याशी गप्पा मारल्या आहेत. आमचा प्रतिनिधी विराज मुळे याने...