मुंबई - स्मिता पाटील यांच्या स्मृतीदिनाचे औचित्य साधून दरवर्षी देण्यात येणाऱ्या स्मिता पाटील पुरस्कारांचे वितरण शनिवारी मुंबईतील विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात करण्यात आले. यंदाचा 'स्मिता पाटील स्मृती पुरस्कार' ज्येष्ठ अभिनेत्री दीप्ती नवल यांना, आणि 'स्मिता पाटील कौतुक पुरस्कार' अभिनेत्री मृणाल कुलकर्णी याना पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी स्मिता पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
स्मिता पाटील यांचा 'भूमिका' हा सिनेमा मी आणि माझ्या कुटूंबियांनी मिळून अमेरिकेत असताना पहिला होता. तोवर मी हिंदी सिनेमात काम करायला सुरुवात केली नव्हती. मात्र, त्याचवेळी मी शाम बेनेगल याच्या सिनेमात काम मिळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, ते माझ्या आईला कळालं आणि ती पुन्हा मला अमेरिकेला घेऊन आली. त्यानंतर शाम बाबुंच्या असिस्टंटने मला फोन करून माझी एक मैत्रीण अमेरिकेला येणार असून पुढे तिची अजून एक फ्लाईट आहे. तोवर तिला जरा कंपनी देशील का..? अशी मला विनंती केली. मी विचारलं नक्की कोण येणार आहे तर तो म्हणाला स्मिता पाटील. मी मोठ्या आनंदाने त्यासाठी होकार दिला. पण त्यावेळी मी तिचे आणि शबाना आझमी यांचे साडीतले फोटो पाहिले होते. त्यामुळे स्मिता साडीतच येईल, असं मी गृहीत धरलं होत. पण प्रत्यक्षात विमानातून एकही व्यक्ती साडीतून उतरली नाही, त्यामुळे मला आमची चुकामुक झाली, असेच वाटले, अखेर मी हताश होऊन प्रसाधनगृहात गेले तिथे एक जीन्स आणि कुर्ता घातलेली मुलगी तोंड धूत होती. तोंड धूत असल्याने तिचा चेहरा मला नीट दिसत नव्हता पण जसा तिने चेहरा वर केला, तसे मी तिला ओळखलं. आणि तिनेही मला ओळखलं, अशी आठवण दीप्ती नवल यांनी यावेळी शेअर केली. पुढे आम्ही जुनून, मिर्च मसाला अशा काही सिनेमात काम केले आणि आमच्यातील मैत्री बहरत गेली.
दुसरीकडे स्मिता पाटील कौतुक पुरस्काराची मानकरी ठरलेल्या मृणाल कुलकर्णी यांनी, या पुरस्काराने माझी जबाबदारी वाढली असल्याचं सांगितलं. तसेच या अभिनेत्रीने आपल्या कामातून, वागण्यातून आणि डोळ्यातून सर्वोत्तम काम करण्याचा मापदंड घालून दिला असून आजही तो आमच्या पिढीच्या अभिनेत्रीसमोर कायम आहे, असे मत मांडले. आजवर 5 वेळा जिजाऊ आईसाहेब यांची भूमिका आपण साकारली असली तरीही अजून 5 वेळा मला ती साकारायला मिळणार असल्याचं तिने सांगितलं. आजच्या पिढीसमोर शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घालून देणे, हे आपले काम असून त्यासाठी आमची टीम कायम प्रयत्नशील राहणार असल्याचे तिने स्पष्ट केलं.
विलेपार्लेचे आमदार पराग आळवणी, अर्च एंटरटेनमेंटचे विनीत गोरे, जीवनगाणीचे प्रसाद महाडकर, स्मिता पाटील यांची मैत्रीण आणि सिनेपत्रकार ललिता ताम्हणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
'लतादिदींची तब्येत आता उत्तम'- हृदयनाथ मागेशकरांचं स्पष्टीकरण
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी पहिल्यादाच या पुरस्कार सोहळ्याला हजेरी लावली. दीदीची तब्येत आता एकदम बरी असल्याची बातमी रसिकांना सांगण्यासाठी आपण आज आलो, असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, महिन्याभरापूर्वी दिदींची तब्येत फारच बिघडली होती. त्यामुळे गेल्या दीड महिन्यातील सगळे कार्यक्रम रद्द केले होते, असे त्यांनी सांगितलं. त्यावेळी ही मोहनवीणा कायमची बंद पडते की काय, अस वाटलं होतं अशी प्रांजळ कबुली बाळासाहेबांनी दिली. मात्र, तिच्यात काही तरी देवी देणगी आहे की डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं आणि आज दीदी पूर्णपणे बरी झाल्याचे त्यांनी सांगितले.