गेल्यावर्षी लागलेल्या लॉकडाऊनमध्ये मनोरंजन-कमतरतेमुळे प्रेक्षकांचे हाल झाले होते. परंतु अनलॉक प्रोसेस मध्ये मालिका चित्रीकरणाला परवानगी मिळाली आणि मालिकांचे नवीन भाग दिसू लागले. त्यातच नवीन मालिकाही प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. त्यातीलच एक म्हणजे सोनी मराठीवरील ‘श्रीमंताघरची सून'. गेल्या ऑक्टोबरमध्ये आलेली ही सिरियल प्रेक्षकांना आवडतेय. आता महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागल्यामुळे नवीन भाग दिसण्याचे थांबणार का हा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता परंतु मालिका निर्मात्यांनी त्यावर तोडगा काढून नवीन भागांचं प्रक्षेपण सुरूच ठेवलं आहे.
राज्यातील लॉकडाऊनमुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण इतर राज्यांमध्ये होते आहे. सोनी मराठी वाहिनीवरील 'श्रीमंताघरची सून' या मालिकेचे चित्रीकरणही राज्याबाहेर सुरू झाले असून मालिकेचे नवीन भाग प्रेक्षकांचा भेटीला आले आहेत. श्रीमंताघरची मुलगी, अनन्या जेव्हा मध्यमवर्गीय कर्णिक कुटुंबात सून होऊन आल्यावर काय घडते, हे या मालिकेतून प्रेक्षकांना दिसते आहे. या मालिकेत देविकाची भूमिका फाल्गुनी रजनी साकारत होती. खरंतर तिने या मालिकेत काम करण्यासाठी ‘भाबीजी घर पर हैं’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेला रामराम ठोकला होता. फाल्गुनी अथर्वच्या काकूच्या भूमिकेत चांगली रमली होती व प्रेक्षकांनाही तिची नकारात्मक भूमिका आवडत होती. परंतु काही अपरिहार्य कारणांमुळे फाल्गुनी आता 'श्रीमंताघरची सून' मालिकेत दिसणार नाहीये.
'श्रीमंताघरची सून' मालिकेत फाल्गुनी साकारत असलेली काकूचं पात्र मालिकेच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. त्यामुळेच तिच्या जागी तेव्हढ्याच ताकदीच्या अभिनेत्रीची गरज होती. आता अभिनेत्री सुप्रिया पाठारे ती भूमिका साकारणार आहे. मराठी कलाविश्वात सुप्रिया पाठारे हे नाव प्रसिद्ध असून त्यांनी आत्तापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत.
'श्रीमंताघरची सून', ही मालिका सोनी मराठी वाहिनीवर प्रसारित होते.
हेही वाचा - सोनालीने 'दुबई'च्या 'गोजिरवाण्या घरात' मांडला सुखाचा संसार