जयपूर - अभिनेत्री श्रद्धा कपूरचे प्राणीप्रेम आपल्या सगळ्यांनाच ठाऊकच आहे. मुक्या प्राण्यांना मदत करणे आणि त्यांना होणाऱ्या निरनिराळ्या यातनापासून वाचवण्यासाठी ती नेहमीच पुढाकार घेत असते. अनेक वेळा याविषयी आवाज देखील उठवला आहे. नुकतेच श्रद्धाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक लेख शेअर केला आहे. यामध्ये राजस्थानमधील पाली गावातील ग्रामस्थांनी भटक्या आणि तहानलेल्या जनावरांच्या मदतीसाठी स्वतःहून खोदकाम करून जलाशय तयार केल्याचा उल्लेख आहे.
निस्वार्थ भावनेने ग्रामस्थांनी केलेल्या या प्रयत्नांचे कौतुक करताना श्रद्धाने असं लिहिल आहे की, “राजस्थानमधील पाली गावातील गावकऱ्यांकडून या प्राण्यांसाठी दाखवण्यात आलेली सहानुभूती निश्चितच कौतुकास्पद आहे. आपण नि:स्वार्थपणे केलेल्या या छोट्याशा प्रयत्नांबद्दल तुमचे खूप खूप आभार.'
एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण जग एकमेकांच्या मदतीसाठी पुढे आलं आहे. मात्र, यात मुक्या प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन करूनही फारच कमी लोक याबाबत पुढाकार घेताना दिसतात. त्यामुळे अशा परिस्थितीत राजस्थानमधील पाली गावच्या ग्रामस्थांनी ऊन, पाणी, वारा एवढंच काय कोरोनाची भीती दूर सारून प्राण्यांसाठी जलाशय तयार केले आहेत. त्यांचं हे काम छोटं असलं तरीही निश्चितच कौतुकास्पद आहे. म्हणूनच श्रद्धाने त्यांच्या या कामाची दखल घेतली आहे.
श्रद्धाने नुकतेच प्राण्यांच्या हक्काबद्दल आवाज उठवणाऱ्या पेटा (PETA) या सामाजिक संस्थेनं बनवलेल्या एका व्हिडियोत सहभागी झाली होती. ज्यामध्ये प्राण्यांना कैदेत ठेवणे आणि देशातील प्राणीसंग्रहालये बंद करण्याबाबत विचार मांडण्यात आला होता. प्राण्यांच्या मदतीसाठी समर्पित भावनेने काम करणाऱ्या अनेक संघटनांना श्रद्धा वेळोवेळी मदत करत असते.