मुंबई - कोरोनानंतरच जग कसं असेल यावर सध्या सोशल मीडियावर कायम चर्चा सुरू असते. त्यातही शुटींगमध्ये नक्की काय बदल होतील याबाबत अनेकजण चर्चा करतात. याच बदलाची झलक आज 'झी मराठी'च्या माझा होशील ना, या मालिकेच्या सेटवर पहायला मिळाली.
या मालिकेच शूटिंग आजपासून ठाण्याजवळील येऊर येथील बंगल्यात सुरू झालं. यावेळी तीन महिन्यांनी पुन्हा एकत्र आलेला कलाकार आणि तंत्रज्ञ यांनी रीतसर पूजा करून शूटिंगचा श्रीगणेशा केला. त्यानंतर या मालिकेतील मुख्य अभिनेता विराजस कुलकर्णी याने सगळ्यांशी थोडा संवाद साधला. कामगार, तंत्रज्ञ अशा प्रत्येकाच्या तोंडावर मास्क, जागोजागी ठेवलेले सॅनिटायझर, संसर्ग रोखण्यासाठी चक्क पीपीई किट घातलेले मेकअप दादा आणि त्यांच्या पुढ्यात बसलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे असा सगळा माहोल इथे पहायला मिळत होता.
राज्य सरकारने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करून कमीत कमी लोकांच्या साथीने या शूटिंगला सुरुवात करण्यात आली. आता सगळे नियम पाळून दररोज शूट सूरु होणार असल्याने या मालिकेचे नवीन एपिसोड लवकरच सगळ्यांना पहायला मिळतील.